नांदेड : नांदेड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून गेल्या २४ तासांत खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शहरातील बाफना परिसरात एका अज्ञाताचा डोक्यात दगड घालून, तर सिडको परिसरात पूर्ववैमनस्यातून (टोळी युद्ध) एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. एकापाठोपाठ घडलेल्या या धक्कादायक घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाफना परिसरातील एका ऑटोमोबाईल्स दुकानासमोर ३० ते ३५ वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह शनिवारी (ता. ८) सकाळी आढळून आला. अज्ञात हल्खोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस त्याची माहिती मिळवत आहेत.
दरम्यान, ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील दुग्ध डेअरी जवळील पेट्रोल पंपासमोर टोळीयुद्ध (गँगवॉर) भडकले. यात बलजितसिंग बावरी (वय २४, रा. कौठा) या तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी भीषण हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात बलजितसिंगचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीम, ठसेतज्ज्ञ, श्वानपथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास वेगाने सुरू आहे.
दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र, सिडकोतील गँगवॉरमध्ये मारल्या गेलेल्या बलजितसिंग बावरी याच्या नातेवाईकांनी आरोपींचा तात्काळ ‘एनकाउंटर’ करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रचंड दहशत पसरली आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
