नांदेड: अपुऱ्या पावसामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी विविध गावांतील शेतशिवारांची प्रत्यक्ष पाहणी केली. कासारखेडा, नांदुसा, चिखली बुद्रुक, भालकी, ढोकी, पिंपळगाव (कोरका), राहाटी, सोमेश्वर आणि जैतापूर आदी गावांना भेट देत त्यांनी शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, केळी तसेच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहणीत दिसून आले. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे पूर्ण भरले नसून अनेक ठिकाणी शेंगा चपट्या व करपलेल्या आहेत. कापसावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन बोंडगळती होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हळद, केळी आणि अन्य फळपिकांनाही पाण्याअभावी फटका बसला आहे.
शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतमजुरांसमोरही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी प्रतिएकर ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतमजुरांसाठी रोजगाराची कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आमदार कल्याणकर यांनी केली. याशिवाय जनावरांसाठी चारा-पाणी, शेतपातळीवरील रस्त्यांची कामे आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. आगामी विधानसभा अधिवेशनात दुष्काळी परिस्थितीसह पीकविमा आणि नुकसानभरपाईचा प्रश्न प्रभावीपणे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत नांदेड उत्तर मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू, असे आमदार कल्याणकर यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान तहसीलदार स्वप्नील दिगलवार, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
