नांदेड : नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी रस्त्यावरील एकतानगर येथे गुरूवार (दि.२७) रोजी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये एका ३२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. आकाश मिलिंद दवणे असे मृत तरुणाचे नाव आहे.

येथील एकता नगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आकाश दवणे व सावते परिवारात वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्यानंतर सावते गटातील तरुणांनी आकाश दवणे यास माराहण केली. या मारहाणीदरम्यान आकाशची आई सविता मिलिंद दवणे व भाऊ महेश मिलिंद दवणे हे सोडविण्यासाठी गेले असता त्या दोघांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. यानंतर जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी आकाश दवणे यास मृत घोषित केले, तर महेश व सविता दवणे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने, पो.नि.संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी नितीन, रोहित, कुणाल सावते या तिघांसह अन्य पाच अशा ८ आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. आकाश दवणे याचा खून कोणत्या कारणावरून झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.