नांदेड : पोचमपाड धरणाच्या बॅक वॉटरमुळे शेतीचे नुकसान होणार्‍या पूरग्रस्त शेतकर्‍यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष निधी द्या, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने  गुरुवारी (दि.२१) रोजी मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे धर्माबाद व परिसरातील हजारो बाधीत शेतकरी दुचाकीवरून मोर्चासाठी नांदेड शहरात दाखल झाले होते.

धर्माबाद तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांची पोचमपाड धरणाच्या बॅक वॉटरमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतकर्‍यांना कोल्हापूर येथील शेतकर्‍यांना दिलेल्या निधीच्या धर्तीवर निधी द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. याच संदर्भात २३ सप्टेंबर २०२५ रोजी बैठक झाली होती; परंतु बैठकीनंतर बरेच दिवस लोटले, तरी शासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे पोचमपाड बॅकवॉटरमुळे नुकसान होणारे शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी धर्माबाद येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी रॅलीद्वारे मोर्चाचे आयोजन केले.

गुरुवारी सकाळी या मोर्चासाठी नांदेड शहरात हजारो शेतकरी दाखल झाले. पोलीस प्रशासनाने यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता. नांदेडमध्ये दुचाकीवर दाखल झालेल्या शेतकर्‍यांच्या दुचाकी अडवण्यात आल्यानंतर त्यांनी छ.शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बाधीत शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले.

या निवेदनात पीकविमा न भरलेल्या शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी २५ हजार रूपये द्यावे, पूररेषेअंतर्गत गावांचे वेगळे महसूल मंडळ स्थापन करावे, पूरग्रस्त शेतकर्‍यांना पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करून महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यानुसार पीकविमा मंजूर करावा, वाढलेल्या खतांच्या किंमती कमी कराव्यात, बाभळी बंधार्‍याच्या बुडीत क्षेत्राचा मंजूर मावेजा तात्काळ वाटप करावा यासह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात डॉ.भगवान मनूरकर, डॉ.बालाजी कोम्पलवार, जगन शेळके, व्यंकटराव जाधव रोशनगावकर यांच्यासह बाधीत शेतकरी सहभागी झाले होते.