नांदेड: उन्हाचा पारा ४३ अंशाच्या पुढे जात असून नैसर्गिक जलस्रोतांचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. प्रचंड उन्हामुळे झाडे वाळून जात असल्याने जंगल विरळ होत आहे. त्यामुळे अन्न-पाण्यावाचून वन्यपशुंची ससेहोलपट होत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने जिल्ह्याच्या वनक्षेत्रात ५० पेक्षा अधिक पाणवठे तयार केले आहेत.

नांदेड जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत १३ टक्के वनक्षेत्र असून किनवट व माहूर तालुक्यात तुलनेने दाट जंगल आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या सर्वात मोठ्या या वनहद्दीत दरवर्षी उन्हाळ्यात अन्न-पाण्यासाठी प्राणांना भटकंती करावी लागते. हे पशु मग गाव-शिवारात शिरतात.

पाळीव जनावरे व अनेकवेळा माणसांवर हल्ले करतात. पाण्याच्या शोधार्थ भटकताना पशु विहिरीत पडल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अलीकडेच एका बिबट्याला किनवट तालुक्यात विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

नांदेड जिल्ह्यात हरण, नीलगाय, रोही,, तरस, लांडगे, ससे, कोल्हे, रानडुक्कर, रानमांजर, सायाळ, मोर व अन्य पशूपक्षी आढळतात. सध्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे झपाट्याने बाष्पीभवन होऊन नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे वनविभागाने किनवट व माहूरच्या जंगलासह माहूर, भोकर व अन्य भागात मिळून सुमारे ५० ते ६० कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. त्यात टँकरद्वारे पाणी सोडले जाते.