नांदेड : समाज माध्यमांवर अश्लील फोटो व व्हीडीओ प्रसृत करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्या चार महिला व एका पुरूष आरोपीस भाग्यनगर पोलिसांनी शनिवार (दि.०१ ऑगस्ट) रोजी अटक केली आहे. नांदेड शहराच्या बेलानगर परिसरात एका व्यक्तीला ३१ जुलै रोजी भ्रमणध्वनीवर फोन करून एका महिला आरोपीने चारचाकी वाहन चालवण्यासाठी चालकाची गरज असल्याचे सांगितले. हा व्यक्ती आपल्याला काम मिळणार, या आशेने बेलानगर परिसरात गेला. तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या चार महिला व एका आरोपी पुरूषाने त्याला बोलण्यात गुंतवत त्याच परिसरात असलेल्या एका घरात नेले.
या आरोपीने जबरदस्तीने संबंधित व्यक्तीचे हात पकडून त्याच्या अंगावरील कपडे काढले व मोबाईलद्वारे फोटो व व्हीडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपींनी हे फोटो व व्हीडीओ चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसृत करू तसेच बलात्कारासारख्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत १ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. व त्याच्या हाताच्या बोटातील ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेत सदर व्यक्तीला जीवे मारण्याची बदनामी करण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.यानंतर सदर व्यक्तीने भाग्यनगर पोलीस स्थानक गाठत आपल्यासोबत घडलेली घटना अधिकार्यांना सांगितली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, पो.नि.संतोष तांबे यांनी आपल्या पथकाला घडलेल्या गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे सदरचा गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपी महिला शीला सुनील भदरगे (वय ३९), इंदू विठ्ठल बार्हाटे (वय ५५), सुनीता रमाकांत सोनकांबळे (वय ५५), रेखा रामचंद्र इंगोले (वय ४५) व अमन मारोती कांबळे (वय २२) रा.नांदेड यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, ऑटो, चार मोबाइल, सोन्याची अंगठी असा ५ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
