नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी आनलाईन जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा निकाल ७७.७० टक्के इतका लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे. असे असले तरी यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल ८४. ६१ टक्के तर मुलांचा निकाल ७१.७४ टक्के लागला आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून होती. शनिवार दिनांक २ मे रोजी दुपारी बारा वाजता निकाल जाहीर करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही लातूर विभागाच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. या विभागाचा एकूण निकाल ८४.१४ टक्के लागला आहे.

नांदेड जिल्ह्यात विज्ञान शाखेचे २९ हजार ६७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी मुले १२५०८, तर १११७१ मुलींचा समावेश होता. यापैकी १०७७७ मुले तर १०२५६ मुली उत्तीर्ण झाल्या. कला शाखेत १३६८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी मुले ७३६८, तर ६३१४ मुलींचा समावेश होता. यात ३६३० मुले, ४५९५ मुली उत्तीर्ण झाल्या.

वाणिज्य शाखेत २५९९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १४३८ मुले आणि ११६१ मुलींचा समावेश होता. वाणिज्य शाखेतील ९०३ मुले उत्तीर्ण झाले तर ९३३ मुलींनी बाजी मारली. विज्ञान कला आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्याचे दिसून येते. कला शाखेचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६०.११ टक्के लागला आहे

तालुका निहाय निकाल

तालुका निहाय निकालाच्या टक्केवारी मध्ये नांदेड ८३.७१ टक्के अर्धापूर ९४ टक्के, भोकर ८२.२८ , बिलोली ८८.९४, देगलूर ६३.६२, धर्माबाद ७८.६३, हदगाव ७२.९५, हिमायतनगर ७८.६४, कंधार ६३.१६, किनवट ७९.५०, लोहा ६५.२६, माहूर ७५.०२ , मुखेड ८२.७२, मुदखेड ९१.४२, नायगाव ७७.७५, आणि उमरी तालुक्याचा ८६.६८ टक्के निकाल लागला आहे.

कंधारचा स्तर घसरला

बारावीच्या परीक्षेमध्ये तालुका निहाय निकालाची टक्केवारी पाहता अर्धापूर तालुका अवल ठरल्याचे स्पष्ट झाले. या तालुक्यातील 94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल कंधार तालुक्याचा लागला असून केवळ ६3.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या तालुक्याचा शैक्षणिक स्तर प्रचंड घासल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवून जिल्हा प्रशासनाने कठोर निर्णय घेतले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध पथके स्थापन करून कॉपी बहादर विद्यार्थी व त्यांना मदत करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला होता. परिणामी एकेकाळी सर्वाधिक टक्केवारीचा तालुका म्हणून मानला जाणाऱ्या कंधार तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी आला आहे.