Disability Motivation Story / नांदेड : सूरजला जन्मच मुळी हाताअभावी मिळाला, त्यामुळे त्याचे पाय हेच त्याचे हात झाले. अशा बहुतांश व्यक्ती कायम इतरांवर अवलंबून जीवन कंठतात; परंतु सूरजने या अपंगत्वावर मात करत बारावीचा पेपर चक्क पायाच्या बोटात पेन धरुन हाताएवढ्याच सफाईदारपणे सोडवला. हे दृश्य जेवढे अचंबित करणारे तेवढेच हेलावणारे ठरले. या दिव्यांगाचे हे दिव्य आता व्हायरल झाले आहे.
सूरज शिवराज उबाळे, रा. गाडेगाव (ता. नांदेड) या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र कंधार शहरातील नवरंगपुरा येथील श्री शिवाजी कॉलेज हे आहे. यावर्षी कॉपीमुक्ती अभियान अधिक प्रभावी व परिणामकारक पद्धतीने राबविले जात असून स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे या एकूणच प्रक्रियेवर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहेत. महसूलसह विविध विभागाची भरारी पथके तयार करण्यात आली असून ती विविध केंद्रांना भेटी देत आहेत. त्यामुळे कॉपीबहाद्दरांचे धाबे चांगलेच दणाणल्याने परीक्षांची चर्चा होत आहे.
कंधारच्या शिवाजी कॉलेज या परीक्षा केंद्रावर एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला. येथे सूरज शिवराज उबाळे, हा विद्यार्थी पायाच्या बोटात पेन धरुन पेपर सोडवत असल्याचे दिसून आले. सूरज हा जन्मतःच अपंग असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. तो आपल्या हातानेच सर्व कामे करतो. अर्थात पाय हेच त्याचे हात आहेत. आपल्या खोप्यामधी खोपा या कवितेत कवयित्री बहिणाबाईंनी खोपा विणणाऱ्या सुगरणीचे वर्णन केले आहे. बहिणाबाई म्हणतात, ”तिची उलुशीच चोच, तेची हात तेची बोट, तुला देले रे देवाने दोन हात दहा बोट’ …. इथे सूरजला मात्र देवाने दोन पायच दिले आहेत, हात मात्र हिरावून घेतले.
अशा दिव्यांग व्यक्ती आपल्या कमजोरीच्या आधारे प्रत्येक बाबतीत सहानुभूती मिळवत संपूर्ण आयुष्य कोणाच्या ना कोणाच्या दयेवर जगतात ; परंतु सूरजने मात्र नियमानुसार त्याला लेखनिक मागण्याची सुविधा असतानाही ते नाकारत आपली इच्छाशक्ती जबरदस्त आणि मन खंबीर असल्याचा पुरावा दिला. अतिशय स्वाभीमानाची प्रचिती देत त्याने हाताएवढ्याच सफाईदारपणे पायाच्या बोटात पेन धरत इंग्रजीचा पेपर सोडवला. समाजात अशी इतरही उदाहरणे आहेत; परंतु फार थोडी.
मध्यंतरी एका दिव्यांग मुलीने मुख्यमंत्री फडणवीसांचे औक्षण पायाच्या बोटाने त्यांच्या कपाळाला कुंकू लावून केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, सूरजच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि लिहिण्याचा वेग पाहून परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, केंद्र संचालक अशोक वरपडे, प्राचार्य मुरलीधर घोरबांड, आणि शिक्षण विस्तार अधिकारी थक्क झाले.
“अपंगत्व हे शरीराला असतं, मनाला नाही. माझा मुलगा जन्मताच दिव्यांग आहे. तो जेवण सुद्धा पायाच्या साहाय्यानेच करतो, म्हणजे पायच त्याचे हात आहेत. दहावीला त्याने ६४ टक्के गुण घेतले होते. माझ्या मुलाची जिद्द पाहून आजच्या पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याची ही धडपड समाजासाठी प्रेरणादायी आहे. याचा मला अभिमान आहे” – शिवराज उबाळे, वडील, गाडेगाव ता. जि. नांदेड.
सूरज दिव्यांग असल्यामुळे त्याला परीक्षेत पेपर लिहण्यासाठी लेखनिक घेता आला असता; परंतु त्याने स्वाभिमानाने आणि ताठ मानेने आहे त्या व्यंगत्वावर मात करत पुढे जाण्याचा आणि परिस्थितीशी दोन हात करत लढण्याचा संदेश दिला आहे. – प्राचार्य मुरलीधर घोरबांड, श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कंधार.
