नांदेड : तेलंगणा पोलिसांच्या पथकावर हल्ला करून हातकडीसह जंगलात फरार झालेल्या आरोपीला किनवट पोलिसांनी सोमवारी सकाळी ११ वाजताचिखली या गावातून ताब्यात घेतले आहे. किनवट तालुक्यातील चिखली येथील आरोपी शेख बकर ऊर्फ जाफर शेख यास एका ऑटो चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यासाठी तेलंगणा राज्यातील बाजार हतनूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश परशुराम गोकला हे आपल्या अन्य तीन साथीदारांसमवेत रविवारी किनवटमध्ये आले होते.

आरोपी शेख बकर यास पोलिसांनी अटक केल्यानंतर वाहनाने तेलंगणा राज्यात नेत असताना किनवट तालुक्यातील चिखली फाटा येथे आरोपीच्या समर्थनार्थ मोठा जमाव जमला होता. येथे उपस्थित असलेल्या ५० ते ६० महिला-पुरुषांच्या जमावाने रविवारी रात्रीच्या सुमारास लाठ्या-काठ्यांच्या साहाय्याने व दगडाने तेलंगणा पोलिसांच्या वाहनावर जोरदार हल्ला चढवला. जमावाने केलेल्या या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. वाहनातील पोलीस कर्मचार्‍यांना मारहाणही करण्यात आली.

या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक रमेश गोकला यांच्या डोक्यास काठीने मारहाण करण्यात आली. यानंतर पोलीस उपनिरीक्षकांनी बचावासाठी आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. हल्ल्यासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपी शेख बकर हा हातकडीसह जंगलामध्ये पसार झाला होता. या प्रकरणी किनवट पोलीस स्थानकात ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता पोलिसांवर हल्ला करणार्‍या ५० ते ६० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची दखल घेत अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. फरार झालेला आरोपी शेख बकर यास शोधण्याचे किनवट पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. आरोपी बकर हा चिखली गावातच लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पो.नि.गणेश कराड, सा.पो.नि.प्रल्हाद जाधव हे आपल्या पथकासह चिखली गावात दाखल झाले. त्यांनी येथे एका घरात लपून बसलेल्या आरोपी शेख बकर यास ताब्यात घेतले व किनवट पोलीस स्थानकात आणण्यात आले. पोलीस पथकावर हल्ला केलेल्या इतर आरोपींचाही शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले.