नांदेड : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्यासह काँग्रेस पक्षातील दोन जणांनी शेवटच्या दिवशी आपापले अर्ज दाखल केले. राजूरकर यांचा अर्ज दाखल करण्याप्रसंगी भाजपाच्या मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी पाठ फिरवली.
वरील निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी रविवारपासून गतिमान झाल्या. भाजपातर्फे राजूरकर यांचे नाव रविवारी रात्री उशिरा जाहीर झाले. त्यानंतर भाजपाचे स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकारी आणि मतदारांची पहिली बैठक सोमवारी सकाळी एका हॉटेलमध्ये झाली. त्यानंतर खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे प्रभृतींच्या उपस्थितीत राजूरकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
रविवारी सायंकाळनंतर काँग्रेस आघाडी तसेच त्यांच्या हितचिंतकांची बैठकही पार पडली. या बैठकीमध्ये भाजपाच्या विरोधात एकच सक्षम उमेदवार देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. काँग्रेसतर्फे तूर्त रामदास पाटील सुमठाणकर यांचा अर्ज दाखल केला गेला. याच पक्षाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वरिष्ठांच्या सूचनेवरून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. नांदेडमधील भाजपाच्या विरोधातील उमेदवार स्थानिक परिस्थिती पाहून अंतिम केला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनीही अर्ज भरले होते. भाजपाच्या विरोधातील उमेदवार या दोघांमधून असेल, असे आधी सांगितले जात होते; पण काही नव्या घडामोडी व वाटाघाटी सुरू असल्यामुळे विरोधकांचा उमेदवार ४ जून रोजी निश्चित होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोमवारी सकाळी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्याशी चर्चा केली. नंतर चिखलीकर हैदराबादमार्गे मुंबईला रवाना झाले.
आठ उमेदवारांचे १७ अर्ज!
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली. या निवडणुकीत आठ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयातून देण्यात आली. भाजपा आणि काँग्रेस उमेदवारांच्या अर्जासोबत ‘एबी’ फॉर्म सादर करण्यात आला आहे. निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत ४ तारखेला ३ वाजेपर्यंत आहे, तर मंगळवारी अर्जांची छाननी होणार असल्याचे सांगण्यात आले.
