नांदेड :  विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये जवळपास शत-प्रतिशत मतदान झाले. आठ मतदान केंद्रांवर ४५२ पैकी ४५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांनी सायंकाळी दिली. भोकर येथील एक महिला मतदार हज यात्रेस गेल्यामुळे त्या मतदानापासून वंचित राहिल्या. झालेल्या मतदानाची टक्केवारी ९९.७८ आहे.

नांदेड शहर वाघाळा महापालिकेसह जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींतील निर्वाचित तसेच स्वीकृत सदस्य (नगरसेवक) वरील निवडणुकीसाठी मतदार होते. नांदेड जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे त्यांचा या निवडणुकीशी संबंध आला नाही. गुरुवारच्या मतदानानंतर भाजपा-महायुतीचे उमेदवार अमरनाथ अनंतराव राजूरकर तसेच कृष्णा पाटील आष्टीकर आणि प्रशांत इंगोले या तीन उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि.२२) नियोजन भवनाच्या सभागृहात होणार आहे.

गेले तीन-चार आठवडे जिल्ह्यात या निवडणुकीची धामधूम सुरू होती. अंतिम मतदार यादीमध्ये भाजपा व मित्रपक्षांचे संख्याबळ तीनशेच्या आसपास होते. विरोधकांमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या नव्वदहून अधिक होती. या पक्षाने आपला अधिकृत उमेदवारही जाहीर केला होता; पण माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महाविकास आघाडीतर्फे अपक्ष अर्ज दाखल केलेले, हिंगोलीच्या खासदारांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांना उभे करण्याचे ठरल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारास माघार घ्यावी लागली. नांदेड मनपात काँग्रेससोबत असलेल्या वंचित आघाडीने आपले नगरसेवक प्रशांत इंगोले यांना उभे केले. त्यांनीही आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे कागदोपत्री या निवडणुकीला तिरंगी स्वरूप मिळाले.

निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे राजूरकर हेच विजयी होतील, असा निष्कर्ष काढण्यात येत होता. खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने आपल्या विजयाचे सूक्ष्म नियोजन केले, तर दुसर्‍या बाजूला विरोधकांमध्ये गोंधळ आणि अनिश्चिततेचे सावट पसरले होते. शेवटच्या टप्प्यात ते अधिक गहिरे झाले. खा.आष्टीकर मतदानाच्या दोन दिवस आधी शिवसेनेच्या फुटीर गटामध्ये दाखल झाल्यामुळे त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या मतदारांवर झाला. काँग्रेसने एक दिवस आधी कृष्णा पाटील यांना मतदान करण्याचा पक्षादेश जारी केला, तरी शेवटच्या दोन दिवसांत काँग्रेसच्या मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी झाली.

भाजपाने मतदानाच्या पूर्वसंध्येला दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मतदारांना एकत्र जमवून मतदानासंदर्भातील प्रशिक्षण त्यांना दिले. गुरुवारी सकाळीच भाजपाच्या नगरसेवकांचे गट वेगवेगळ्या मार्गांनी आपापल्या मतदान केंद्रांकडे सामूहिकपणे रवाना झाले. पहिल्या दोन तासांत केवळ २२ जणांचे मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यात २३७ मतांची भर पडली. त्यानंतरच्या दोन तासांत झालेल्या मतदानाची संख्या ४०० पार गेली. ४ वाजता मुदत संपली तेव्हा ४५१ जणांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले. आठपैकी सात मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले, तर भोकरच्या मतदानाची नोंद ९७.९२ टक्के झाली.

अमर राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील : खा. अशोक चव्हाण

मतदानाच्या दरम्यान भाजपा नेते खा.अशोक चव्हाण, पक्षाचे दुसरे खासदार अजित गोपछडे, उमेदवार अमर राजूरकर व त्यांचे निकटवर्तीय तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी वेगवेगळ्या केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचा आढावा घेत होते. महाविकास आघाडी तसेच शिवसेना ठाकरे गटात जे काही घडले तो त्यांचा अंतर्गत विषय होता; पण त्याचा अप्रत्यक्ष लाभ आम्हाला झाला. आमचे उमेदवार राजूरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास खा.चव्हाण यांनी दुपारीच व्यक्त केला.