नांदेड: माळेगाव ता.लोहा येथे राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझाजवळ धावत्या कारला अचानक आग लागली. चालक व मालक असलेल्या विशाल शेटकर यांनी प्रसंगावधान राखत कारमधून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव येथील टोल प्लाझाजवळ लोह्याहून अहमदपूरकडे जाणारी फोर्ड कार क्र.एम.एच.१४.डीएफ.८९१४ या कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये चालक व मालक असलेले विशाल दीपक शेटकार रा.चवंडानगर ता.अहमदपूर हे कार चालवत होते. त्यांच्या कारने पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत कार थांबवून बाहेर उडी घेतली.
यामुळे जीवितहानी टळली मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या संदर्भात माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास माळेगांव बिट जमादार ए.एस.आय. हनमंत बोंबले हे करीत आहेत.
