नांदेड : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत नांदेडमध्ये आजवर कोणालाही सलग तीन विजयांची नोंद करता आली नाही; पण आता या महिन्यामध्ये होत असलेल्या या ‘अर्थ’पूर्ण निवडणुकीत भाजपा उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना ‘हॅट्ट्रिक’ साधण्याची संधी मिळाली आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांत माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यातील दूत म्हणून वेळोवेळी महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या राजूरकर यांनी चव्हाणांसोबतच भाजपात प्रवेश केल्यांनतर या पक्षातर्फे प्रथमच उमेदवारी मिळाली आहे. २०१० ते २०२२ या कालावधीत त्यांनी काँग्रेसतर्फे याच मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केले. २०१४-१५ नंतर त्यांचे फडणवीस यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. त्यातून त्यांची उमेदवारी नक्की झाली. रविवारी रात्री भाजपाच्या इतर उमेदवारांसोबत त्यांचे नाव जाहीर होताच त्यांनी आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाला मोठी परंपरा आहे. मराठवाड्यातील पहिले पद्म पुरस्कार मानकारी श्यामराव कदम यांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले होते; पण या मतदारसंघाचा १९८६ पूर्वीचा पूर्वेतिहास येेथे उपलब्ध नाही.
१९८६ साली काँग्रेसने मुखेड तालुक्यातल्या सामान्य कुटुंबातील किशन मक्काजी राठोड यांना या मतदारसंघात उभे करून निवडून आणले होते. त्यानंतर १९९२च्या निवडणुकीतही त्यांनी ही जागा राखली. तेव्हा कोणत्याही पदावर नसलेले अशोक चव्हाण हे राठोड यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. नंतर चव्हाण यांनाही काँग्रेसने विधान परिषदेवर घेतले.
१९९८च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राठोड यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी भाजपा-शिवसेनेच्या मदतीने निवडणूक रिंगणात उडी टाकली. त्यांच्या विरोधात तेव्हाच्या एकत्रित काँग्रेसने माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार दिला होता. या लढतीत कदम यांनी राठोड यांचा दारूण पराभव केल्यामुळे त्यांची हॅट्ट्रिक चुकली. नंतरच्या निवडणुकीतही कमलकिशोर कदम यांनी शेषराव चव्हाण यांचा पराभव करून आपली जागा राखली.
तब्बल बारा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर २०१०च्या निवडणुकीवेळी कमलकिशोर यांनी स्वेच्छा निवृत्ती पत्करली. राज्यात तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. या आघाडीतर्फे अशोक चव्हाण समर्थक राजूरकर यांना सर्वप्रथम संधी मिळाली. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोघांनीही शेवटच्या क्षणी कच खाल्ल्यामुळे राजूरकर बिनविरोध निवडून आले; पण पुढच्या म्हणजे २०१६च्या या मतदारसंघातील निवडणुकीत राजूरकर यांना भाजपाच्या मदतीने निवृत्त सनदी अधिकारी एस.डी.शिंदे यांनी मोठे आव्हान दिले होेते. या अटीतटीच्या लढतीत शेवटी राजूरकर यांची सरशी झाली.
मागील चार वर्षांपासून वरील मतदारसंघाची जागा रिक्त होती. मधल्या काळात जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती व नांदेड मनपाची निवडणूक होऊन या सर्व संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट आल्यामुळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपामध्ये राजूरकर यांच्याशिवाय इतर काही कार्यकर्त्यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न केले; पण गेल्या दीड वर्षांपासून पक्षाचे शहराध्यक्षपद सांभाळणार्या राजूरकर यांना पक्षाकडून पसंती मिळाली.
चित्र ४ जून रोजी स्पष्ट होणार!
राठोड आणि कमलकिशोर कदम यांना या मतदारसंघातील सलग दोन विजयानंतर पुन्हा संधी मिळाली नव्हती; पण आता जिल्ह्यात भाजपाच्या मतदारांचे संख्याबळ सर्वांपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय मराठवाडा जनहित पार्टीचे ३९ आणि इतर बर्याच नगरसेवकांचा पाठिंबा राजूरकर यांना असल्यामुळे या मतदारसंघात हॅट्ट्रिक नोंदविण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. असे असले, तरी खा.चव्हाण यांचे विरोधक एकत्र येण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे खरे चित्र ४ जून रोजी स्पष्ट होईल.
