नांदेड ः लेखन-प्रकाशनचौर्य ही वाङ्मयीन जगतातील प्रचलित कृती आता राजकीय क्षेत्रातही उतरली असून नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीत १४० वर्षांची गौरवशाली परंपरा सांगणार्‍या काँग्रेसने या पक्षाचे माजी नेते, भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे २०१७ सालच्या मनपा निवडणुकीतील मनोगत जशास तसे उचलले आहे.

काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते तसेच खासदार रवींद्र चव्हाण आणि इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. निवृत्त अधिकारी एकनाथ मोरे यांनी संपादित केलेला काँग्रेसचा जाहीरनामा बाहेर आल्यानंतर या पक्षाने केलेली उचलेगिरी उघड झाली. त्यावर भाजपा किंवा खा.अशोक चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पण काँग्रेस पक्ष बौद्धिक दिवाळखोरीकडे जात असल्याचे मत भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

नांदेड मनपाच्या २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसने ‘विचारांतून विकासाकडे’ या शीर्षकाचा शाश्वत विकासाची हमी देणारा जाहीरनामा नांदेडकरांसमोर ठेवला होता. या जाहीरनाम्याचे जनक पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘असावे शहर आपुले छान’ या मथळ्याखाली आपले व्यापक निवेदन नांदेडकरांसमोर ठेवले होते. पक्षाची गौरवशाली परंपरा सांगताना या निवेदनातून त्यांनी तेव्हा भाजपावर संयत परंतु लक्ष्यवेधी निशाणा साधला होता. घरोघर गेलेल्या त्या जाहीरनाम्याने काँग्रेसला निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले होते.

आताच्या निवडणुकीत खा.अशोक चव्हाण यांनी भाजपाचा जाहीरनामा नांदेडकरांसमोर नववर्षाच्या पहिल्याच दिनी नांदेडकरांसमोर सादर करताना ‘चला, आता परिवर्तन घडवू या’ असा निर्धार केला. भाजपाच्या या जाहीरनाम्यानंतर इतर पक्षांमध्ये जाहीरनामा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली असून या दोन पक्षांच्या संयुक्त जाहीरनाम्यात खा.रवींद्र चव्हाण आणि वंचितचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचे निवेदन प्रारंभी देण्यात आले असून खा.चव्हाण यांच्या निवेदनातून काँग्रेसची उचलेगिरी स्पष्ट झाली. अशोक चव्हाण यांच्या मागील निवेदनातील ९ परिच्छेद खा.रवींद्र चव्हाण यांच्या नावानिशी प्रकाशित झाल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नांदेड ही परिवर्तनाच्या लढ्याची ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीने आंबेडकरवादी चळवळीचा पहिला खासदार देशाला दिला. मलाही या भूमितून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. नांदेडमधील सत्ता अनेक दशकांपासून व्यक्तिकेंद्रीत झाली आहे. या शहराचा विकास खुंटला आहे. हीच स्थिती बदलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत युती करून मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला असून भाजपाला रोखण्याची सुरुवात नांदेडमधून करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर,अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.