नांदेड: पक्ष संघटनेत तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा संवाद बैठकीनिमित्त उपस्थित राहण्यासाठी शशिकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर आले असता एका हॉटेलमध्ये आयोजित वार्ताहर बैठकीत त्यांनी पक्षाची पुढील दिशा व भूमिका स्पष्ट केली. राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा पातळीवर संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले असून नांदेडमध्ये पक्ष मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे, असे ते म्हणाले.

कार्यकर्ता मेळावा व संवाद बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेणार आहोत तसेच जनतेचे प्रश्न त्यांच्या अडचणी जाणून पक्ष वाढीसाठी कोणती भूमिका घ्यावी लागेल, याचाही विचार केला जाईल असे शिंदे म्हणाले.

विष्णुपुरी परिसरातील उड्डाण पुलाच्या एका बाजूचा भराव कोसळल्याच्या घटनेबद्दल बोलताना शिंदे म्हणाले देशभरातील अशा अनेक उड्डाणपुलांचे भाग कोसळत आहेत अशा घटनांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांच्या पदाधिकारी उपस्थित होते.

वार्ताहर बैठकीनंतर झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडून कुठल्याच प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याबद्दल रोष व्यक्त केला. जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असताना आज घडीला मात्र रसातळाला गेल्याची खंत व्यक्त करण्यात आली.