नांदेड : नांदेड शहरात ब्राऊन शुगर विक्री करण्यासाठी आलेल्या अमृतसर (पंजाब) येथील महिलेसह अन्य तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.२०) रोजी पकडले. आरोपींकडून यावेळी ७२.३ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिठ्ठा) व दुचाकी जप्त करण्यात आली. चार आरोपींविरुद्ध वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. काहींना हद्दपार तर काहींना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून नांदेड शहरात अमृतसर येथून ब्राऊन शुगर विकण्यासाठी आरोपी महिला राजविंदरकौर जर्मनजीतसिंघ महाल (वय ३८) रा.दुरिया जि.अमृतसर आली आहे. ती व येथील स्थानिक आरोपी गुरूमितसिंघ ऊर्फ गुरूसेवकसिंघ (वय २८) रा.शहीदपुरा हे दोेघेजणं दुचाकीवरून जिल्हा न्यायालय परिसर ते हिंगोली गेट रस्त्यावरून जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचत दोन्ही आरोपींची झडती घेतली.
यावेळी त्यांच्याकडे ७२.३ ग्रॅम ब्राऊन शुगर (चिठ्ठा) ज्याची किंमत ३ लाख ६० हजार रूपये व दुचाकी असा एकूण ४ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या दोघांना गुन्ह्यात मदत करणार्या अमनप्रीतसिंघ ऊर्फ मनी जगजीतसिंघ वेदी (वय ३०) रा.नांदेड, जनार्दन ऊर्फ पटेल गोविंदराव सोनटक्के (वय ३१) रा.ब्राह्मणवाडा या चौघांविरुद्ध वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
