नांदेड : “तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न मी साकार करतो,” असे आमिष दाखवून उमेदवारांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा कारनामा उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी कडक पाऊल उचलत संबंधित पोलीस अंमलदाराला तडकाफडकी निलंबित केले असून त्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात आणि उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कडक शिस्तीत राबवली जात आहे. मात्र, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस अंमलदार नागनाथ माधव नागरगोजे (बक्कल क्रमांक २१६३) याने या प्रक्रियेला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला. त्याने लेखी परीक्षेत मदत करण्याच्या नावाखाली काही उमेदवारांशी मोबाईलवर संपर्क साधून पैशांची मागणी केली.
प्राथमिक माहितीनुसार, या कर्मचाऱ्याने जवळपास दहा लाख रुपये जमा केल्याचे समोर आले आहे. किमान तीन उमेदवारांकडून त्याने प्रत्यक्ष पैशांची मागणी केल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने शहानिशा केली व पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागनाथ नागरगोजे याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ आणि मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम १९५६ मधील नियम ३ अंतर्गत निलंबित केले आहे.
१९९ जागांसाठी ११ ते २३ फेब्रवारी पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली हाेती. या प्रक्रीयेत जवळपास १४ हजार ६८२ उमेदवार सहभाग नाेंदवला हाेता. त्यानंतर मैदानी चाचणीत उत्तीर्ण हाेणा-या २ हजार ५५४ उमेदवारांची रविवारी १५ मार्च राेजी लेखी परीक्षा पार पडली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ही परीक्षा पार पडली.त्यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून उमेदवारांवर लक्ष ठेवण्यात आले हाेते.
लेखी परीक्षेदरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र परीक्षेच्या आगाेदर नागरगाेजेंचा कारनामा पुढे आल्याने पाेलीस अधिकारीही सावधान झाले हाेते. “भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. कोणत्याही उमेदवाराने अशा भूलथापांना बळी पडू नये. भ्रष्टाचाराचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” असे आवाहन करुन ही पाेलीस कर्मचारी नागरगाेजेंनी झटपट श्रीमंत हाेण्याच्या नादात उचलले पाऊल त्याला महागात पडले आहे. त्याच बराेबर प्रामाणिकपणे परिक्षेची तयारी करुन परीक्षा देणा-यां उमेदवारांची या घटनेमुळे धाकधुक वाढली आहे.
या घटनेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, भरती प्रक्रियेची विश्वासार्हता जपण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे.जिल्हा पाेलीस अधीक्षक यांनी लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शक झाल्याचे सांगून विद्यार्थांना प्रश्नपत्रिका घरी जाऊन देण्याची मुभा दिली शिवाय, आेएमआर सिटची कार्बन काॅपीपण उमेदवारांना घेऊन जाण्याची परवानगी दिली तसेच लगेचच आॅनलाईन उत्तर टाकल्याने उमेदवारांना तातडीने आपण सोडविलेले उत्तर लगेचच तपासता येणार आहे. आणि आपला काय निकाल लागेल हे देखील कळणार आहे.
