छत्रपती संभाजीनगर – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एका रेल्वेमध्ये प्रवाशांना लक्ष्य करून दरोड्याची तयारी सुरू झाली होती. या शिवाय गळ्यातील सोन्याची साखळी ओढून चोरी करण्याची, अकोल्याजवळ चोरीच्या उद्देशाने सिग्नलची केबल कापतानाच्या घटनेचाही उलगडा करण्यासह एका सतरा वर्षाच्या मुलालाही शोधण्यात यश आले. नांदेड विभागातील मागील दोन दिवसांमधील या चार घटना असून, परंतु सुरक्षा यंत्रणांच्या संबंधित धोका लक्षात येताच त्यांनी यशस्वीपणे उलगडा केला. दरोडाप्रकरणातील दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोबाईल फोन, दाेन दुचाकी, चार धारदार लोखंडी शस्त्रांसह १ लाख ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ऑपरेशन यात्री सुरक्षा, ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) या तिन्ही कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या. या संदर्भातील माहिती नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत ७ मार्च रोजी नांदेड–हडपसर एक्सप्रेसमध्ये (क्र. १७६३०) छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेचा आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाई करून यशस्वी उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला प्लॅटफॉर्म क्रमांक ०४ जवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे १७.५७ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली. या साखळीची अंदाजे किंमत ४३ हजार ७०० रुपये असून, जप्त माल तपासासाठी सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
८ मार्च रोजी पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि तीन धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे एक लाख ८० हजार रुपये आहे. आरोपींना जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
८ मार्च रोजीच रोजी परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संबंधित आरोपीला जीआरपी परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत ७ मार्च रोजी अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे सिग्नलिंग केबल चोरीची घटना टळली. प्लॅटफॉर्म क्रमांक ०६ जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन व्यक्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे १० मीटर सिग्नलिंग केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींना रेल्वे संपत्ती (बेकायदेशीर ताबा) अधिनियम अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी कर्मचाऱ्यांनी घरातून पळून जाऊन रेल्वेत चढलेल्या १७ वर्षीय मुलाची सुटका केली. समुपदेशनानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे करण्यात आले.
