नांदेड : मागील तीन नक्षत्रांमध्ये जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाल्यानंतर ‘पुष्य’ नक्षत्रातील दमदार पर्जन्यवृष्टीने ग्रामीण भागात दाटलेले चिंतेचे ढग दूर सारले आहेत; पण नांदेड महानगर आणि परिसराला पाणी पुरवठा करणार्या विष्णुपुरी प्रकल्पासह वरच्या भागातील बंधार्यांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे.
गेल्या तीन-चार दिवसांत जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य दिसून आले. अनेक भागात हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त ठरल्याचे दिसून आले. बुधवारपाठोपाठ गुरुवारीही जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. बुधवार ते गुरुवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्यातील उमरी बाजार, मुदखेड आणि मुगट या ३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १७ मंडळांमध्ये एक किंवा दोनवेळा अतिवृष्टी झाली. वार्षिक सरासरी तसेच गतवर्षीच्या ३० जुलैची स्थिती ह्या तुलनेत यंदाचा पाऊस बराच कमी आहे.
१ जून ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात पडणार्या पावसाची सरासरी ३९१ मि.मी. असते; पण यंदा वरील कालावधीमध्ये ३२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी ३० जुलैपर्यंत ३४५ मि.मी. पाऊस झाला होता. तसेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. यंदा या प्रकल्पात अद्याप ५० टक्केही साठा झालेला नाही. गुरुवारी सकाळी विष्णुपुरीमध्ये ३४ टक्के पाणीसाठा होता, तर त्यावरच्या अंतेश्वर, दिग्रस या बंधार्यांतील पाणीसाठाही जेमतेम असल्याचे जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालातून स्पष्ट झाले.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. गुरुवारची सकाळ तर पाऊस-सरींसहच उगवली. काही वेळ विश्रांती तर काही काळ पाऊसधारा असे दिवसभरातील चित्र होते. विशेष म्हणजे नांदेड तालुक्यासह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये २४ तासांमध्ये दमदार पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद मुदखेड तालुक्यात (७५ मि.मी.) तर त्याखालोखाल किनवट तालुक्यात (५० मि.मी.) झाली. इतर सर्वच तालुक्यांमध्ये एक ते दीड इंच पाऊस झाला. पुष्य नक्षत्रात प्रथमच पावसाचे सातत्य दिसून आले. असे असले, तरी संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कृषी विभागाच्या अहवालानुसार २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड या दोन तालुक्यांत खरीप पिकांची १०० टक्के पेरणी झाली आहे. बहुसंख्य तालुक्यांत ९० टक्क्यांच्या वर पेरण्या झाल्या असून पेरा झालेल्या क्षेत्राची गतवर्षीच्या क्षेत्राच्या तुलनेत यंदा झालेल्या पेरणीची टक्केवारी ९६ असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
