नांदेड : अर्धापूर तालुक्यातील लहान या गावात संपूर्ण दारूबंदी असतानाही या गावात अवैध मार्गाने चालणार्‍या दारू विक्रीसंदर्भात वार्तांकन करणार्‍या रामचंद्र माणिकराव मनपूर्वे या स्थानिक वृत्तपत्राच्या वार्ताहरास धमकावून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील कलमांसह पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लहान या गावाची ओळख हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या चळवळीतील एक महत्त्वाचे केंद्र अशी आहे; पण अलीकडच्या काळात या गावामध्ये अवैध मार्गाने दारूविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामचंद्र मनपूर्वे यांनी स्थानिक वृत्तपत्रात काही बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळे या व्यवसायात गुंतलेल्यांनी गुुरूवारी रात्री मनपूर्वे यांना धमकावले व त्यांना जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला; पण त्याचवेळी मनपूर्वे यांचे वडील व पत्नी लक्ष्मी हे मदतीसाठी धावून आल्यामुळे आरोपींचा प्रयत्न अयशस्वी झाला.

या गंभीर प्रकारानंतर रामचंद्र मनपूर्वे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी गुन्हा दाखल करून संतोष गोले व अनिल सावंत या आरोपींना अटक केली. यातील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात प्रथमच पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्ह्याची नोंद झाली.

लहान या गावात दारूबंदीचा निर्णय फार पूर्वीच घेण्यात आला होता. त्यानंतर डीजे व भोंगाबंदीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. गावचा कारभार बघणारे कारभारी स्थानिकांच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेत असताना अवैध धंदे चालविणार्‍यांनी डोके वर काढल्याची बाब वारंवार मांडण्यात आली; पण संबंधितांवर आजवर कोणतीही कारवाई झाली नाही.

पत्रकारावरचा हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. ही दारूमाफियांची दादागिरी असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. – अ‍ॅड.किशोर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजपा नांदेड उत्तर.