नांदेड : पूर्वी भोकर येथे प्रस्तावित असलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंत्रालयीन एका बाबूने आक्षेप घेतला, त्यामुळे ते किनवट येथे प्रस्तावित करावे लागले. त्याला आता हदगावच्या आमदारांनी आक्षेप घेतला आहे. तर नांदेड येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालय दक्षिणसाठी करावे व मूळ कार्यालय जे आता दक्षिणसाठी प्रस्तावित आहे, ते उत्तर नांदेडमध्ये हलवावे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित आहे. परिणामी महसूल दिन तसेच पाठोपाठ आता स्वातंत्र्य दिनाचाही ही कार्यालये स्थापन होण्याचा मुहूर्त हुकल्यात जमा आहे.
मराठवाड्यात नांदेड व बीड हे दोन मोठे जिल्हे असून त्याचे अद्याप विभाजन झालेले नाही. नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन किनवट हा जिल्हा निर्माण व्हावा, अशी खूप जुनी मागणी आहे. ती वारंवार शासन स्तरावर मांडण्यात आली ; परंतु त्याकडे अद्याप गांभीर्याने पाहिले गेले नाही. दरम्यान, नांदेड तालुका हा प्रचंड मोठा असून शहराची लोकसंख्या वरचेवर वाढत आहे. मागील दोन दशकात नांदेड शहर एज्युकेशन व हेल्थ म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील रुग्ण तर राज्यभरातील विद्यार्थी येथे अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे येथील लोकसंख्या वाढत चालली आहे.
२०२५ च्या जनगणनेचा निकाल समोर आला नाही ; तरी देखील शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या घरात पोहोचली आहे. याशिवाय नांदेड शहरात गुरुद्वारा असून येथे वर्षाकाठी दहा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे विमानतळ असून रेल्वे सेवेचा विस्तार देखील मोठा आहे. त्यामुळे राज्य तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची येथे सतत ये-जा असते. त्यामुळे नांदेड तहसील वरील कामाचा बोजा प्रचंड आहे.
गतिमान प्रशासनाची संकल्पना शासन राबवत असताना कामाच्या प्रचंड बोजामुळे सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे येथील तहसील कार्यालयाचे विभाजन होऊन नांदेड शहर व ग्रामीण अशी दोन कार्यालये स्थापन व्हावीत अशी मागणी होती ; पण पुढे त्यात सुधारणा होऊन नांदेड दक्षिण व उत्तर अशी दोन स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन केली जावी अशी मागणी पुढे आली ; पण व्यावहारिक दृष्ट्या शासन स्तरावर अपर तहसील कार्यालयाची संकल्पना पुढे आल्याने नांदेड उत्तरसाठी अपर तहसील असावे व मूळ तहसील कार्यालयाने नांदेड दक्षिणची जबाबदारी पार पाडावी, असे प्रस्तावित करण्यात आले होते ; परंतु त्याला आक्षेप घेण्यात आला आहे.
नांदेड येथे एक अपर जिल्हाधिकारी व चार अपर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे ; परंतु ती कुठे स्थापन करावयाची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. वास्तविक नांदेड जिल्ह्याला मंजूर झालेले अपर जिल्हाधिकारी कार्यालय भोकर येथे स्थापन व्हावे अशी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्यामागे कारण असे होते की, यापूर्वीच भोकर येथे अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व अलीकडे भूमि अभिलेख कार्यालय स्थापन झाले असून या दोन्ही कार्यालयांना अनुक्रमे नऊ व आठ तालुके जोडले आहेत. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालय देखील येथेच व्हावे अशी या मागची व्यावहारिक भूमिका होती ; परंतु मंत्रालयातील महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव बदलून किनवट येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवावा लागला ; पण आता त्याला हदगावच्या आमदाराने आक्षेप घेतला आहे.
हदगाव येथून किनवट येथे जाणे उलट दिशेने असून ते व्यावहारिक दृष्ट्या व भौगोलिक दृष्ट्या देखील परवडणारे नाही, असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा आक्षेप शासन दरबारी प्रलंबित आहे. याशिवाय अपर तहसील कार्यालय जे नांदेड येथे मंजूर झाले होते, त्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार मूळ तहसील कार्यालय नांदेड दक्षिण साठी असावे व अपर तहसील कार्यालय नांदेड उत्तर साठी असावे असे सूचित करण्यात आले होते ; परंतु त्यालाही आक्षेप घेण्यात आला असून मूळ तहसील कार्यालय उत्तर नांदेड मध्ये हलवावे व अपर तहसील कार्यालय नांदेड दक्षिण साठी असावे असा आक्षेप आहे. तो देखील शासन दरबारी प्रलंबित आहे.
दरम्यान ज्यावेळी ही कार्यालय मंजूर झाली होती त्यावेळीच मुहूर्त कोणता असेल याबाबत कयास व्यक्त केले जात होते. पूर्वी महाराष्ट्र दिन अर्थात एक मे या दिवशी ही कार्यालय स्थापन होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता ; पण तो मुहूर्त मागे पडला. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी ही कार्यालय स्थापन होतील असा कयास बांधला जात होता ; पण ते देखील आता शक्य दिसत नाही. दरम्यान शासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून वेळेत निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे महसूल आयुक्तालयाच्या बाबतीत अभ्यास गट वगैरे नेमण्याचे नाटक करून पुढे तो विषय थंड बस्त्यात टाकण्यात आला, तसाच काहीसा प्रकार या कार्यालयांच्या बाबतीत होईल की काय? अशी भीती आता व्यक्त होत आहे.
