नांदेड : राज्यभर गाजत असलेला शालार्थ आयडी घोटाळा आता नांदेडमध्ये झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शालार्थ आयडी मिळवलेल्या १४९ शिक्षकांच्या मूळ संचिका तपासणीसाठी मागवल्याची माहिती प्राप्त होत आहे. या आदेशामुळे नांदेडच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागात मागील काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रूपयांचा शालार्थ आयडी घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यात पात्र नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करून सन २०१२ पासून बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाकडून पगार लाटण्यात आला होता.

या प्रकरणात शासनाने ऑगस्ट २०२५मध्ये पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना केली होती. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची शंका समितीला होती. या समितीने केलेल्या तपासादरम्यान अनेक वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांना अटक करण्यात आली होती.

ही समिती मागील महिन्यात तपासणीसाठी लातूर विभागात आली होती. या समितीकडे नांदेड जिल्ह्यात शालार्थ आयडी मिळवलेल्या शिक्षकांच्या बाबतीत व्ही.एम.भोसले यांनी तक्रारी केल्या होत्या. याच तक्रारीच्या अनुषंगाने साहाय्यक शिक्षण संचालक लातूर यांनी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलेल्या १४९ शिक्षकांची माहिती मागवली आहे. शालार्थ आयडी मिळवलेल्या या शिक्षण संस्थांमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या शाळांचाही समावेश आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी अनभिज्ञ!

साहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांना विशेष चौकशी पथकामार्फत होणार्‍या चौकशीसाठी १४९ शिक्षकांना दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या मूळ संचिका उपलब्ध करून देण्याबाबतची यादी पाठवली; परंतु याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.