नांदेड : जिल्ह्यातील काही संस्था, उपक्रम आणि प्रकल्पांस डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव लागल्यानंतर जिल्हा पातळीवरील त्यांचे समकालीन नेते, सहकारमहर्षी श्यामराव कदम यांचे नाव नव्याने सुरू होणार्या उपजिल्हा रुग्णालयास देण्याची मागणी एका राजकीय गटाकडून समोर आली असून ‘शंकरमय’ झालेल्या जिल्ह्यात श्यामरावांची स्मृती जपण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
नांदेड तालुक्यातील वाडी बुद्रुक या गावच्या परिसरात वरील रुग्णालयाच्या उभारणीसाठी शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रयत्न तसेच पाठपुरावा केला होता. शिवसेना पक्ष एकत्रित असताना तत्कालीन आघाडी सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते. त्याचे उद्घाटन येत्या रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होत असताना राज्य निर्मितीनंतर या जिल्ह्याच्या पायाभरणीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या श्यामराव कदम यांचे नाव चर्चेत आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.
नांदेड जिल्ह्याच्या सहकार आणि शैक्षणिक चळवळीत श्यामराव यांनी वरील योगदान दिले. चार दशकांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी जिल्हा बँक, जिल्हा परिषद, कलंबर कारखाना, शारदा भवन शिक्षण संस्थेसह अनेक संस्थांचे नेतृत्व केले. लिंबगाव हे त्यांचे मूळ गाव वाडीलगतच असून या व आसपासच्या भागात त्यांचा मोठा प्रभाव होता. पद्म पुरस्काराचे मराठवाड्यातील पहिले मानकरी, अशीही नोंद त्यांच्या नावावर आहे. १९६८ साली पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. राज्य बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी प्रकल्प आणि इतर काही ठिकाणांना शंकरराव चवहाण यांचे नाव दिले गेले. नांदेडजवळच्या कृषी महाविद्यालयाला त्यांचेच नाव देण्याबाबतची प्रक्रिया मध्यंतरी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समकालीन नेत्यांचाही मरणोत्तर बहुमान झाला पाहिजे, या भूमिकेतून काँग्रेसमधील संदीपकुमार देशमुख, महेश देशमुख, संदीप तरोडेकर प्रभृतींनी नव्या उपजिल्हा रुग्णालयास श्यामराव कदम यांचे नाव द्या, अशी मागणी गेल्या आठवड्यात केल्यानंतर सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनीही ही मागणी उचलून धरली. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनीही या मागणीला समर्थन दिले आहे.
श्यामरावजींचे मोठे योगदान लक्षात घेता, त्यांच्या प्रभावक्षेत्रातील नव्या उपजिल्हा रुग्णालयास त्यांचे नाव देणे योग्य व समर्पकच ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. तथापि ग्रामीण रुग्णालयांस राजकीय पार्श्वभूमीच्या नेत्यांची नावे देण्याची पद्धत प्रचलित आहे का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यानंतर संदीपकुमार देशमुख यांनी त्याचे निरसन करणार्या बाबी समोर आणल्या.
गेल्यावर्षीच्या जानेवारीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयास माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केल्यानंतर तो अंमलात आणला गेला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नामकरणास मान्यता दिली होती. तसेच पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयास महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडजवळच्या उपजिल्हा रुग्णालयास पद्मश्री श्यामराव कदम यांचे नाव देण्यात यावे, अशी भावना त्यांचे जामात डॉ.हंसराज वैद्य यांनी व्यक्त केली.
