नांदेड : जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील बडूर येथे ‘तलवारबाबा’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या ज्ञानेश्वर नागोराव करडे याच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला जात असताना आपल्या दोन समर्थकांसह ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचार्‍यांना जाब विचारून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात या भोंदूबाबाच्या करामती मागील दोन-तीन आठवडे राज्यभर गाजल्यानंतर नांदेड जिल्ह्यात हरीगिरी महाराज या भोंदूबाबाचे कारनामे समोर आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर बिलोली तालुक्यातील तलवारबाबाचे प्रकरण समोर आले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर करडे हा गेल्या चार वर्षांपासून स्वतःचा दरबार भरवत असे. आपल्या मागे दैवी शक्ती असल्याचा दावा करून आजारपण दूर करणे, कौटुंबिक प्रश्न सोडवणे, महिलांना मंतरलेले लिंबू देऊन त्याबदल्यात रोखरक्कम किंवा वस्तु स्वीकारण्याचे सत्र त्याने सुरू केले होते. त्याच्याकडील तलवारीमुळे तो तलवारबाबा या नावाने ओळखला जातो.

या बाबाचे कारनामे पोलिसांसमोर आल्यानंतर २९ मार्च रोजी त्याच्याविरुद्ध पोलीस कर्मचारी माधव तोटेवाड यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन (जादूटोणाविरोधी) कायद्याच्या कलम ३ अनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना ज्ञानेश्वर करडे ऊर्फ तलवारबाबा तसेच शिवकांत शिवराम मैलारे व नबाजी बाबा वाघेकर हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून तोटेवाड यांनी दिलेली फिर्याद फाडून टाकली. या प्रकारानंतर फौजदार शिवराज लोखंडे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३मधील वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

तलवारबाबाविरुद्ध एकाच दिवशी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर बडूर हे छोटेसे गाव चर्चेमध्ये आले. मात्र या बाबाविरुद्ध बिलोली परिसरातून कोणत्याही व्यक्तीने अद्याप तक्रार दिलेली नाही. या भोंदूबाबाच्या कारवायांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी तसेच समाजाचे शोषण करणार्‍या अशा बाबांना वेसण घालण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कमलाकर जमदाडे यांनी केली.

बिलोली तालुक्यातील जनतेने कोणत्याही भोंदूबाबांच्या भूलथापांना बळी पडू नये. आपली फसवणूक किंवा शोषण झाले असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी केले आहे. पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.