नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या केली असल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून शनिवारी उघड झाली. या वृत्ताला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी दुजोरा दिला.
नांदेड-मुदखेड मार्गावरील पुणेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून धावती चारचाकी वाहन नदीपात्रात घालून आपल्या दोन चिमुकल्यांसह स्वतःचे आयुष्य संपवल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली होती.

घटनेपूर्वी आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस तसेच एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर संदेश टाकत शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचे नाव घेत आत्महत्या करत असल्याचे मोरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मोरे यांनी आपली मुलगी सारा मोरे, मुलगा सुमीत मोरे या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने गोदावरी नदीत बुडालेले त्यांचे चारचाकी वाहन बाहेर काढले होते. तिघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते.

उत्तरीय तपासणीनंतर याबाबतचा अहवाल पोलीस विभागाला प्राप्त झाला असून या अहवालात सुनील मोरे याने आपल्या दोन चिमुकल्यांची धारदार शस्त्राने छाती आणि पोटावर वार करून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी मृत सुनील मोरे याच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकात दोन चिमुकल्यांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस जमादार श्यामसुंदर मुपडे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.