नांदेड: नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि टनकपूर ते हुजूर साहिब या गाड्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून सोमवारी सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह, जितीन प्रसाद आणि अजय तामटा हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
स्वतंत्र रेल्वे गाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी अखेर दक्षिण मध्य रेल्वेने पूर्ण केली आहे. अकोला, मनमाडमार्गे ही गाडी धावणार असून सोमवारपासून नांदेडकरांना मुंबईसाठी ही स्वतंत्र रेल्वे मिळणार मिळाली आहे. शिवाय मुंबईसह टनकपूर-नांदेड ही नवी गाडीही मिळणार आहे.
नांदेडची रेल्वे संपर्क सुविधा अधिक बळकट करण्यासाठी ६ जुलैपासून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत केला जात असून, जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. याच दिशेने हजूर साहिब नांदेड येथून दोन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी एक गाडी राज्याच्या राजधानी क्षेत्राशी तर दुसरी देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देणार आहे.
नांदेड-मुंबई-नांदेड एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला व मनमाड मार्गे धावेल. या गाडीत आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. टनकपूर-नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नांदेडहून रविवारी तर टनकपूरहून मंगळवारी धावेल. ही गाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांना उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध करून देईल.
नांदेड रेल्वेस्थानकावर सकाळी झालेल्या शुभारंभ कार्यक्रम खासदार अशोक चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे, खा.रवींद्र चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, महापौर कविता संतोष मुळे यांच्यासह रेल्वे डिव्हीजनचे अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
