नांदेड : पुणे आणि नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर नांदेड येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी स्थानिक मागण्यांसाठी चक्क १५० किमी अंतराचा लॉंग मार्च काढण्याचे ठरविले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय किनवट येथे स्थलांतरित करण्यासंदर्भात लेखी आश्वासन न मिळाल्यास आदिवासी विद्यार्थी नांदेडहून किनवटकडे पायी ‘लॉंग मार्च’काढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, रविवारी रात्री किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ.बी. सरवणन यांनी नांदेड येथील उपोषणस्थळी भेट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र लेखी आश्वासनांशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय मागण्यांच्या व्यतिरिक्त नांदेड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तीन वेगळ्या मागण्या असून त्यांनी आपले उपोषण आणि आंदोलन मागे घेतलेले नाही. सोमवारी दुपारपर्यंत त्या मागण्या मान्य न झाल्यास नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण स्थगित करून आदिवासी विद्यार्थी किनवटकडे ‘लाँग मार्च’ काढणार आहेत.
नांदेडहून पायी निघणारे आदिवासी विद्यार्थी भोकर, हिमायतनगर आणि इस्लापूरमार्गे दोन ते तीन दिवसांत किनवटला जाणार आहेत. या प्रवासादरम्यान मार्गावरील आदिवासी विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी करून घेत संख्या वाढविण्यात येणार आहे. किनवट येथे पोहोचल्यानंतर आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू ठेऊन मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आंदोलनकर्ते विद्यार्थी मंथन वाळके, संतोष तायवाडे आणि बी.एस.एकनाथ यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती जात तपासणी समिती कार्यालय तातडीने मूळ पत्ता असलेल्या किनवट येथे स्थलांतरित करणे, नर्सिंग विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणीच्या तक्रारींची चौकशी करून कारवाई करणे आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांना प्रवेश निःशुल्क देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे.
तसेच नांदेड येथील आदिवासी वसतिगृहाची क्षमता एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाढवून नवीन इमारत उभारावी, संगणक कक्ष व अभ्यासिका सभागृहासह शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेची रक्कम वाढवावी आणि डीबीटी योजना सुरू करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष
माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष सुरू असून विद्यार्थी आता किनवट येथील प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर धरणे देण्यासाठी १५० किमी अंतर चालत जात लॉंग मार्च काढणार असल्याची माहिती मंथन वाळके, बी. एस. एकनाथ आणि संतोष तायवाडे यांनी दिली आहे. वाटेत भेटेल त्या आदिवासी बांधवाना, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
