नांदेड : पुणे आणि नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेतले असले, तरी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाची धार कायम आहे. छत्रपती संभाजीनगर येथे असलेले अनुसूचित जमाती (एसटी) जात पडताळणी कार्यालय किनवट येथे स्थलांतरित करावे, या मागणीवर नांदेडचे विद्यार्थी ठाम आहेत. कार्यालयाचा पत्ता किनवटचा असताना मुख्यालय छ. संभाजीनगर मध्ये कसे ? असा सवाल नांदेड येथील विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुण्यातील मांजरी येथे १७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण शनिवारी रात्री स्थगित करण्यात आले. मात्र, नांदेडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्थानिक मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवले आहे. नांदेडच्या १६ मागण्यांमध्ये जात पडताळणी कार्यालय किनवट येथे स्थलांतरित करण्याची मागणी तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, कार्यालयाचा अधिकृत पत्ता ‘किनवट, जिल्हा नांदेड’ असा नमूद असताना प्रत्यक्ष कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी कार्यालय छत्रपती संभाजीनगरात ठेवले जात आहे का? असा सवाल आदिवासी विद्यार्थी बी. एस. एकनाथ यांनी उपस्थित केला. मूळ पत्ता किनवटचा असताना आदिवासी बांधवांना एका प्रमाणपत्रासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो; मग त्यांच्या गैरसोयीचा विचार कोण करणार, असा प्रश्न त्यांनी केला.

या मागणीसाठी आदिवासी नेते तथा किनवटचे भाजपा आ. भीमराव केराम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जात पडताळणी कार्यालय किनवट येथे आणण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे या मागणीला स्थानिक राजकीय पाठबळही मिळाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या प्रश्नासाठी खा. रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. जात पडताळणी कार्यालय किनवट येथे स्थलांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवावे, अशी विनंती करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मेस सुविधा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी कृती आराखडा, जीआर रद्द करणे आणि साडेबारा हजार पदांची भरती यांसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, तीन महिन्यांत मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईतील वर्षा बंगला तसेच आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

नांदेडमध्ये संतोष तायवाडे, विलास ढोले, मंथन वाळके, सचिन गमेवाड, राम येलकेवाड, नागेश मेश्राम, आकाश कोहचाडे, सदानंद पिटलेवाड, अभय तलांडे, मुकुंद कुचलवाड, बी. ए. स. एकनाथ आदी आदिवासी विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणावर ठाम आहेत.

पत्ता किनवटचा; कार्यालय मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये!

अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयाचा पत्ता किनवट, जिल्हा नांदेड असताना प्रत्यक्ष कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. नांदेड, हिंगोली व लातूर या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कार्यालयासाठी आदिवासी बांधवांना किनवटपासून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, पैसा व मनस्ताप सहन करावा लागत असून, कार्यालय मूळ पत्त्यावर म्हणजेच किनवट येथेच स्थलांतरित करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.