नांदेड – शहरात गँगवॉरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून शहरातील ई-स्क्वेअर परिसर आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात हल्लेखोरांनी हल्ले करुन खून केला. ही संपूर्ण घटना शुक्रवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घडली.
या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी सविस्तर सांगितला की, शहरातील कॅनाल रस्त्यावर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून अरिजीतसिंग गजानन चव्हाण याच्यावर हल्ला चढवला. अचानकपणे धारदार शस्त्रांनी केलेल्या या जोरदार हल्ल्यात २५ वर्षीय अरिजीतसिंग याचा जागीच मृत्यू झाला.
अरिजीतसिंग हा आपल्या दोन मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी आला असताना हल्लेखोरांनी नियोजनबध्द पध्दतीने त्याचा ‘गेम ‘केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख हे देखील गंभीर जखमी झाले. भररस्त्यात झालेल्या या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ई-स्क्वेअर परिसरातील हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, या घटनेचे पडसाद तिथेही उमटले. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मृत अरिजीतसिंगचा भाऊ राजेश चव्हाण हा हातात चाकू घेऊन थेट शासकीय रुग्णालयात शिरला.
त्याने अपघात विभागाजवळ उपचार घेत असलेल्या सय्यद आवेज (२७) आणि मोहम्मद अरबाज (२३) यांच्यावर सपासप वार केले. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील इतर साथीदारांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आल्याने हल्लेखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आरोपी निष्पन्न करुन त्यांना तातडीने अटक करण्याचें निर्देश पोलिसांना दिले आहेत.
ई-स्क्वेअरचे बाजूला रात्री दीड वाजताचे सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून नांदेड जिल्ह्याच्या अभिलेख वरील काही गुन्हेगारां मध्ये तलवार व खंजीर ने मारामारी होऊन त्या घटनेत एका बाजूचे अर्जित सिंग व दुसऱ्या बाजूचे सय्यद अवेज व महम्मद अरबाज असे तीन लोक मरण पावले असून एकमेकांविरुद्ध असे दोन मर्डरच गुन्हे दाखल करीत आहोत. दोन्ही बाजूचे काही आरोपी ताब्यात आहेत. सदर दोन्ही बाजू मध्ये साई अग्रवाल उर्फ साई लाला व त्याचे साथीदार व दुसर्या बाजूला अर्जित सिंह चव्हाण व त्याचे साथीदार असे आरोपी आहेत. सर्व वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. तपास चालू आहे.
