छत्रपती संभाजीनगर : नांदेड शहरातील गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांमधील वादातून रुग्णालयात करण्यात तिसरा खून हा पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाला. आरोपी सपासप वार करताना पोलीस हजर तर होतेच. शिवाय महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारीही तिथे होते. पण त्यातील काहींनी आरोपीस थांबविण्याऐवजी त्याचे छायाचित्रण काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. या तिसऱ्या खूनात सय्यद आवेज मारला गेला. छायाचित्रण आणि पोलीस उपस्थितीमधील खुनाचे चित्रण समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
नांदेड शहरातील तिहेरी हत्याकांड शुक्रवारी मध्यरात्री हादरले. एका टोळी प्रमुखाचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या भावाने दुसऱ्या टोळीतील दोघांची शासकीय रुग्णालयात जाऊन हत्या केली. शहरातील ई-स्क्वेअर परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन्ही टोळ्यांकडून परस्परविरोधी तक्रारींवरून एकूण २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यातील १५ जणांना अटक केली आहे. अरजितसिंग चव्हाण (वय २५), सय्यद आवेज (२७) आणि मोहम्मद अरबाज (२३), अशी खून झालेल्या तिघांची नावे होती. यातील अरजितसिंग चव्हाण याची एक स्वतंत्र टोळी आहे. तर आवेज व अरबाज हे दोघे अनिल पंजाबी आणि साईलाला यांच्या टोळीसाठी काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
शुक्रवारी अरजितसिंग हा आपल्या दोन मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. तेथून मध्यरात्री निघाला असता त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख यांनी हल्ला चढवला. यामध्ये अरजितसिंगचा जागीच मृत्यू झाला. तर आवेज आणि अरबाज हे गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मृत अरजितसिंगचा भाऊ राजेश चव्हाण हा हातात चाकू घेऊन थेट शासकीय रुग्णालयात शिरला आणि त्याने अपघात विभागाजवळ उपचार घेत असलेल्या आवेज यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला होता.
तिसरा आरोपी आवेज यास रुग्णालयात नेत असताना दोन पोलीस कर्मचारी हजर होते. यातील एकाने जखमी आवेज यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र, अन्य एकाने असा प्रयत्न केला नाही. हा प्रकार काही क्षणात घडला. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याच्या स्तरावर चौकशी केली केली जात आहे. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडूनही हल्ला होत असताना कोणी वाचिवण्याचा प्रयत्न केला नाही.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांना विचारले असता, ही घटना घडताना दोन पोलीस कर्मचारी हजर असल्याचे त्यांनी मान्य केले. यातील एकाने हल्ल्यातील व्यक्तीस वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. अन्य सुरक्षा जवानही संरक्षणार्थ उतरले नाहीत, असे दिसून येत आहे. याबाबतची चौकशी लवकरच पूर्ण केली जाईल.
