नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दाखल झालेले ८ उमेदवारांचे एकुण १७ अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

नांदेडच्या राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असे संकेत असले तरी 4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवार दि. १ जूनपर्यंत महायुतीच्यावतीने भाजपचे अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे रामदास पाटील, यांच्यासह ज्योतिबा खराटे, प्रविण पाील चिखलीकर, कृष्णा नागेश पाटील (अपक्ष),प्रविण पाटील चिखलीकर, माधवराव निवृत्तीराव पवार, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले या आठ उमेदवारांनी एकुण १७ अर्ज दाखल केले होते. यापैकी अमरनाथ राजूरकर आणि रामदास पाटील या दोघांनीही नामनिर्देशनपत्रांसोबत आपापल्या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला आहे.

मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात सर्व १७ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर आणि रामदास पाटील यांच्यात सरळ लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. परंतु काँग्रेसने रामदास पाटील यांना एबी फॉर्म दिला असला तरी माधवराव पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. दोघांपैकी कोण माघार घेणार? हा प्रश्न आहे.शिवाय स्थानिक पातळीवर महायुतीसोबतच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची अद्याप संयुक्त बैठक झालेली नसल्यामुळे मित्र पक्षांच्या मतदारांचा पाठींबा मिळविण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे.