नांदेड : विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील आपल्या स्थानिक पक्षनेत्यांची भूमिका ठरण्याआधीच भाजपाच्या तंबूत शिरलेल्या गोरठेकर गटाने पाठिंब्याच्या बदल्यात जिल्हा बँकेवर एकाची वर्णी आणि उमरी जीनिंग-प्रेसिंगच्या जागेची विक्री अशा दुहेरी लाभाचा शब्द भाजपा नेत्यांकडून घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे पुत्र कैलास हे स्थानिक राजकारणात आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचे समर्थक मानले जातात. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात भाजपा नेत्यांनी बैठकीला येण्यासंदर्भात दिलेले निमंत्रण स्वीकारू नका व त्यांच्या बैठकीला जाऊ नका, असा निरोप चिखलीकरांकडून गेला होता, तरी कैलास गोरठेकर काही समर्थकांसह भाजपाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्याचा येथे बराच गाजावाजाही झाला.
उमरी नगर परिषद गोरठेकर गटाच्या ताब्यात असून तेथील त्यांच्या नगराध्यक्षांसह २० नगरसेवकांची मते निश्चित करण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मारोतराव कवळे, संजय कुलकर्णी प्रभृतींना थांगपत्ता न लागू देता गोरठेकरांशी जुळवून घेतल्याची बाब समोर आली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीतील काही जागांची वाटणी होणार हे ‘लोकसत्ता’ने आधीच लक्षात आणून दिले होते. आता राष्ट्रवादीच्या चिखलीकर यांनी भाजपासोबत राहण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे बँकेच्या निवडणुकीत कंधार, लोहा, उमरी (कदाचित बिलोली) तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’साठी सोडले जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
खा.अशोक चव्हाण यांचे समर्थक मारोतराव कवळे यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी उमरी तालुक्यात भक्कम पायाभरणी आणि निर्णायक मतदार नोंदणी करून गोरठेकरांसमोर आव्हान उभे केले; पण वि.प.निवडणुकीच्या निमित्ताने बदललेल्या स्थानिक परिस्थितीत कवळे यांना त्यांच्या तयारीनुसार बँकेची निवडणूक लढवता येईल की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेमध्ये आ.चिखलीकर यांच्यासाठी लोहा व कंधार तालुक्यातील दोन्ही जागा महत्त्वाच्या असून विधान परिषद निवडणुकीत त्यांचे सूर आता भाजपाच्या स्थानिक नेत्यांसोबत जुळल्यामुळे त्यांच्या कन्या प्रणिता देवरे यांच्यासह आणखी एकाचा बँकेच्या संचालक मंडळावर येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वाढली आहे, तर चव्हाण गटाकडून बँकेवर येऊ इच्छिणार्यांवर संक्रांत ओढावली आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम या किंवा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. बँकेच्या निवडणुकीत खा.चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाने आ.चिखलीकर व त्यांच्या गटाला दूर ठेऊन निवडणुकीत उतरण्याचे नियोजन चालविले होते. पण तत्पूर्वी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय चित्र बदलल्याचे दिसत आहे.
गोरठेकरांचा आणखी एक मुद्दा म्हणजे बहुचर्चित उमरी जीनिंग-प्रेसिंग संस्थेच्या ८.४३ हेक्टर जागेची विक्री. त्यासाठी मागील दहा वर्षांपासून चाललेल्या कायदेशीर लढाईत आतापर्यंत गोरठेकर विरोधकांची सरशी झाली. त्यांनी खा.चव्हाण व आ.राजेश पवार यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीने जमीन विक्रीच्या प्रयत्नांना तसेच त्यातून मोठी रक्कम मिळविण्याच्या संबंधितांच्या इराद्यांना सुरुंग लावला; पण नव्या राजकीय घडामोडींमध्ये गोरठेकरांचा वरील प्रलंबित विषय भाजपाकडून मार्गी लागण्याची शक्यता वाढल्यामुळे उमरीतील खा.चव्हाण समर्थक अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील नेत्यांमध्ये काय चालले आहे, याची आम्हाला कल्पना नाही; पण जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील आमची भूमिका आम्ही खा.अशोक चव्हाण यांच्यासमोर स्पष्ट केली आहे. उमरी तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे मी आधीच ठरविले व त्यानुसार तयारीही केली. काहीही झाले, तरी ही निवडणूक मी लढवणार आहे. तसेच उमरी जीनिंगची जमीन विक्री करण्याच्या खटाटोपास आमचा विरोध कायम आहे. – मारोतराव कवळे.
