नांदेड: विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीतील ही जागा राज्यातल्या महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला सुटणार हे जवळपास नक्की झाले असून या माहितीला या पक्षाच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला. पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. भाजपातील ही घडामोड गुरुवारी दुपारी समोर आल्यानंतर या पक्षाच्या विरोधात इतर प्रमुख पक्षांची मोट बांधून एक उमेदवार देण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
वरील निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारी (दि.१) दुपारपर्यंत आहे. आतापर्यंत प्रमुख इच्छुकांसह अनेक हौशी कार्यकर्त्यांनी अर्ज खरेदी केले असले, तरी भाजपाचे संभाव्य उमेदवार अमरनाथ राजूरकर, याच पक्षातील अन्य एक इच्छुक यांपैकी किंवा स्थानिक पातळीवर भाजपाच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तसेच काँग्रेस पक्षातर्फे कोणीही अर्ज दाखल केलेला नाही, असे दिसून आले.
शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा.डॉ.श्रीकांत शिंदे बुधवारी सायंकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे, माधव पावडे प्रभृतींनी खा.शिंदे यांची ते वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांच्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्यासंदर्भाने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आदेश दिला, तर आमच्या पक्षाचा उमेदवार उभा केला जाईल, असे चिखलीकर यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. चिखलीकर यांचे पुत्र युवाचार्य प्रवीण यांनी निवडणूक अर्ज घेऊन ठेवला असल्याचेही समोर आले.
वरील निवडणुकीसाठी भाजपा-मजपा व त्यांना मदत करू शकणार्या एमआयएम या पक्षांच्या मतदारांचे संख्याबळ १९७ आहे, तर स्थानिक पातळीवर या पक्षाच्या विरोधात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, दोन्ही शिवसेना या पक्षांचे संख्याबळ सव्वादोनशेच्या पुढे असल्याचे दिसून येेते. भाजपाच्या विरोधात सर्वांनी मिळून लढत दिली, तर त्यात यश येऊ शकते असे खा.श्रीकांत शिंदे यांना येथून सांगण्यात आले. मात्र अशा प्रकारची अनैसर्गिक आघाडी आकारास येऊ शकेल काय, याबद्दल मोठी साशंकता असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे खासदार मागील पाच दिवसांपासून कौटुंबिक सहलीवर गेलेले आहेत. या पक्षाचे संख्याबळ १००च्या आसपास असूनही भाजपा विरोधात सक्षम उमेदवार देण्याच्या बाबतीत कुठलीही हालचाल नसल्याचे दिसून आले.
विधान परिषदेच्या इतर काही मतदारसंघांतील पेच सुटला नसल्यामुळे ज्या जागांवर वाद नाही, त्या जागांची घोषणाही अद्याप होऊ शकली नाही. भाजपाच्या उमेदवारांसंदर्भात मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष गुरुवारी दिल्लीमध्ये होते. या पक्षातर्फे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा मोठा गाजावाजा झाला; पण पक्षातल्या काही मंडळींकडून खा.चव्हाण यांचे दुसरे निकटवर्ती किशोर मल्लिकार्जुन स्वामी यांचेही नाव पुढे केले असल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यांना टाळून भाजपाने प्रणिता देवरे-चिखलीकर यांना उमेदवारी दिली, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा मिळू शकतो, अशी योजना या पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने मांडली.
