नांदेड : विधिमंडळाच्या वरच्या (अपर) सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी पाठविण्याचा ‘अर्थपूर्ण’ अधिकार स्थानिक प्राधिकारी संस्थांतील ज्या नगरसेवकांना प्राप्त झाला, त्यांतील २९ जणं निरक्षर आणि काहींमध्ये शारीरिक दोष अशा ३५ जणांना मतदानासाठी साहाय्यक देण्यात आल्याची माहिती गुरुवारी समोर आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर प्रक्रिया सुरू झाली. नांदेड मनपासह एकूण १७ संस्थांचे ४५२ नगरसेवक या निवडणुकीचे मतदार होते.

या निवडणुकीत आपल्या उमेदवारास महायुतीची तसेच अन्य संभाव्य मते मिळावीत, यासाठी भाजपा नेत्यांनी अत्यंत सूक्ष्यम नियोजन केले. काही मतदारांसाठी साहाय्यक (मदतनीस) मिळावा, हाही भाजपाच्या नियोजनातील भाग होता, ही बाब मात्र मतदानाच्या दिवशी स्पष्ट झाली.
यासंदर्भाने जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता, वेगवेगळ्या स्थानिक प्राधिकारी संस्थांतील चाळीसहून अधिक नगरसेवकांनी वेगवेगळी कारणे नमूद करून मतदानाचा हक्क बजावताना साहाय्यक मिळावा, अशी विनंती निवडणूक अधिकार्‍यांकडे केली होती, असे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर अशा अर्जदारांना अनुमती देण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित मुख्याधिकार्‍यांचा अभिप्राय मागविला होता. त्यानंतर ३५ जणांना मतदानासाठी मदतनीस घेण्यास अनुमती देण्यात आली. कायद्यामध्ये तशी तरतूद असून भाजपाने या तरतुदीचा लाभ घेतला, असे बाहेर म्हटले जात असले, तरी कागदोपत्री तशी नोंद कोठेही झाली नाही, असे एका जबाबदार अधिकार्‍याने सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार वरील ३५ जणांपैकी २९ जणं अक्षरज्ञान नसलेले किंवा उर्दू माध्यमात जुजबी शिक्षण झालेले होते.

त्यांना मतदानासाठी साहाय्यक देण्यात आला. अशाच एका महिला मतदारास नांदेडमधील पत्रकाराच्या पत्नीने मदत केली. काहींनी दृष्टीदोष, विकलांगता, कंपवात (हात थरथरणे) अशी कारणे देत मदतनीस मान्य करून घेतला. वरील सर्व मतदार कोणकोणत्या पक्षांचे किंवा गटांचे होते, याची नेमकी माहिती मिळाली नाही. पण उपलब्ध असलेल्या तरतुदीचा लाभ भाजपाने घेतल्याची बाब ‘राष्ट्रवादी’च्या एका नेत्याने मान्य केली.

मतदानाच्या एकदिवस आधी नांदेडच्या भाजपाने लातूर येथे ‘मतदार प्रशिक्षण वर्ग’ या बॅनरखाली तीनशे मतदारांना तेथील एका सभागृहात जमवले होते. यांतील बहुसंख्य मतदार सहल आटोपून लातूरमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले. प्रशिक्षण वर्गास खा.अशोक चव्हाण व उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी मार्गदर्शन केले. भाजपाच्या निमंत्रणावरून आ.प्रताप पाटील चिखलीकरही बुधवारी लातूरला गेले. मतदार आणि नेत्यांनी तेथेच मुक्काम केला. गुरुवारी सकाळी भाजपाने जमवलेले नगरसेवक गटागटाने आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाल्याचे दिसून आले. भाजपाने या वर्गाची माहिती आधी गोपनीय ठेवली होती; पण काही नेत्यांनी ही बाब समाजमाध्यमांतून उघड केली.