नांदेड : विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघावर वर्षानुवर्षे आपला ताबा राखणार्या काँग्रेस पक्षावर निवडणुकीतून हद्दपार होण्याचा प्रसंग उद्भवला आहे. गुरुवारी दुपारपर्यंतच्या घडामोडींमध्ये काँग्रेसच्या अधिकृत तसेच याच पक्षाच्या अपक्ष उमेदवारास माघार घ्यावी लागली. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. वरील निवडणुकीत भाजपाने माजी आमदार व या पक्षाचे शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली असून अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
या मतदारसंघात आजवर काँग्रेस किंवा मित्रपक्षाच्या उमेदवारानेच प्रतिनिधित्व केले. मागील काही निवडणुकांत भाजपाला निवडणुकीतून पळ काढावा लागला होता; पण या निवडणुकीत तसा प्रसंग काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांच्यावर आला. याच पक्षाचे माजी आमदार व अपक्ष अर्ज दाखल करणारे माधव पवार जवळगावकर यांनीही शेवटच्या दिवशी माघार घेतली. स्थानिक पातळीवरील चर्चा आणि काँग्रेस-उबाठा सेनेच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर खा.आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांचा अर्ज कायम राहिला.
गुरुवारी सकाळपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये स्वतंत्रपणे हालचाली सुरू झाल्या. खा.अशोक चव्हाण व भाजपा उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी दिलेली भेट व तेथेच झालेल्या संयुक्त वार्ताहर बैठकीनंतर चिखलीकर पुत्र प्रवीण पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महायुतीतील बंडखोरी टळली. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घोळ प्रदीर्घ काळ चालला. त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत तसेच याच पक्षाच्या अपक्ष उमेदवाराने माघार घेतली; पण वंचितचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार प्रशांत इंगोले यांनी आपला अर्ज कायम ठेवला.
या मतदारसंघातील निवडणुकांचा १९८६ पासूनचा इतिहास पाहता दोन उमेदवारांमध्ये सरळसरळ लढत झाल्याचे बघायला मिळाले; पण आता तिरंगी लढत होत आहे. भाजपाला ही जागा बिनविरोध मिळू द्यायची नाही, अशी योजना विरोधकांनी आखली होती. ती प्रत्यक्षात उतरली असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस, उबाठा शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तीन पक्षांचेसंख्याबळ सव्वाशेच्या आसपास तर महायुतीचे संख्याबळ तीनशेपार असल्यामुळे या मतदारसंघावर यंदा प्रथमच भाजपाचा झेंडा फडकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नांदेडमधील निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या दोघांनी आपसांत चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेनुसार नांदेडमध्ये ठाकरे गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांनी निवडणूक लढवावी, असे ठरल्यानंतर हे दोन्ही नेते नांदेडच्या स्थानिक नेत्यांशी बोलले. त्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत तसेच अपक्ष उमेदवार जवळगावकर यांनी माघार घ्यावी, असे ठरले. त्यानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण झाली रामदास पाटील सुमठाणकर
