नांदेड : विधान परिषदेचा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आगे-मागे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘बँक’ हे लक्ष्य असणार्‍यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरून किंवा घेऊन वाटाघाटीची तयारी चालवली आहे.

विधान परिषदेच्या वरील मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया नांदेडमध्ये सुरू असून सोमवारी (दि.१) दुपारी ३ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. माघार घेण्याची मुदत ४ जून आहे. ही प्रक्रिया जारीअसताना जिल्हा बँकेच्या मतदारांची यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. पुढील आठवड्यात या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तत्पूर्वी बरेच जण परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरणार असून माघारीपूर्वी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर दबाव आणून जिल्हा बँकेतील आपली जागा निश्चित करण्याची त्यांची योजना आहे, असे दिसते.

जिल्हा बँकेतील भास्करराव खतगावकर, प्रताप पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह एकंदर आठ माजी संचालक बँकेची आगामी निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यांना आपल्या जागी अन्य निकटवर्तीस उभे करावे लागणार आहे. त्यादृष्टीने काहींच्या हालचाली सुरू आहेत.
परिषदेच्या निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेच्या मतदारांचे संख्याबळ अत्यंत तोकडे आहे. महाविकास आघाडीतर्फे या पक्षाला अधिकृतपणे उमेदवारीची संधी नाही, पण या पक्षातर्फे एकाने परिषदेकरिता अर्ज भरल्यानंतर परिषद निवडणुकीदरम्यान जिल्हा बँकेसाठी वाटाघाटी कराव्यात, असा त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

‘राष्ट्रवादी’मधून काही प्रमुखांनी परिषद निवडणुकीसाठी भाजपाच्या विरोधात एक सक्षम उमेदवार दिला गेला पाहिजे, यासाठी मोर्चेबांधणी चालवली असली, तरी त्यांचे मुख्य ‘लक्ष्य’ बँक हेच असल्याचे दिसत आहे. या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते विधान परिषद निवडणुकीच्या कोणत्याही डावपेचांत सहभागी नाहीत. कारण त्यांना आपल्या राजकीय वारसास बँकेत आणायचे असल्यामुळे खा.अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये जायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याचे दिसते.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २३ जागांच्या आगामी निवडणुकीमध्ये खा.चव्हाण यांच्या गटाचे प्राबल्य राहण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अ,ब,क’ मतदार संघातील जागांसाठी अनेक जण चव्हाण गटामध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असून काही विरोधी नेत्यांना लोहा, कंधार, हदगाव, उमरी आणि बिलोली सेवासहकारी सोसायटी मतदारसंघांसह अन्य एखादी जागा आपल्यासाठी सुरक्षित करून घ्यायची आहे. यासंबंधाने पुढील आठवड्यात विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत संपण्यापूर्वी चर्चा-वाटाघाटी होतील, असे सांगण्यात आले.

खा.अशोक चव्हाण गेले काही दिवस नांदेडबाहेर आहेत. परिषदेसाठी नांदेडमधील भाजपाचा उमेदवार निश्चित करताना त्यास शक्यतो बिनविरोध किंवा निवडणुकीद्वारे निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाईल. या बाबीची त्यांच्या स्थानिक विरोधकांना पूर्वकल्पना असल्यामुळे स्थानिक पातळीवरील वाटाघाटींमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

जिल्हा बँकेची मतदार यादी प्रसिद्ध!

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर प्रत्येक प्रकरणाचा निर्णय २७ मे रोजी देण्यात आला. मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी ज्यांचे अर्ज विभागीय सह निबंधकांनी मंजूर केले, त्यांची नावे अंतिम मतदार यादीत आली आहेत. जूनच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यादरम्यान बँकेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होईल, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.