नांदेड: महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचा तीन दिवसीय नांदेड दौरा बुधवारपासून सुरू झाला असून या समितीतील २८ पैकी ८ आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे समितीचे अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले.
नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या कामांना भेटी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नांदेडला विधानमंडळ अंदाज समिती पाठवली आहे. या समितीत अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील २८ सदस्यांचा समावेश आहे. मंगळवारी रात्रीपासूनच शासकीय विश्रामगृहात समिती सदस्य मुक्कामी येणार म्हणून लगबग सुरू होती.
बुधवार (दि.०८) रोजी ही समिती आपल्या सदस्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियोजन भवन येथे विभागप्रमुखांची बैठक घेणार असल्याचे नियोजित दौर्यात नमूद केले होते. अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांनी दिवसभर बैठक घेतली. या बैठकीत समितीतील सदस्य असलेले आ.किशोरअप्पा पाटील, आ.सदाभाऊ खोत, आ.शेखर निकम, आ.कैलास पाटील, आ.राजेश राठोड, आ.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर एवढेच समिती सदस्य हजर असल्याचे दिसून आले.
नियोजन भवनात झालेल्या बैठकीला केवळ विभागप्रमुखांचीच उपस्थिती होती. याच बैठकीत जिल्ह्यात मागील काळात खर्च करण्यात आलेल्या जलजीवन मिशन, महावितरण, गोदावरी नदी प्रदूषण यांसह अन्य बाबींचा कसून आढावा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या समितीची बैठक गोपनीय असून बैठकीतील तपशील बाहेर जाणार नाही, याची काळजी विभागप्रमुखांनी अगोदरच घेतली होती.
आ.खोतांची गांधीगिरी!
विधानमंडळ अंदाज समिती सदस्य असलेल्या आ.सदाभाऊ खोत यांनी वर्कशॉप भागातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. येथील विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडदकर हे कार्यालयात उपस्थित नव्हते. यावेळी आ.खोत यांनी नांदेड शहरातील भाजपा कार्यकर्त्यांसह विभागीय नियंत्रणकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. अशा अधिकार्याला कायम निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
