नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील भाजपाच्या पहिल्या महापौरपदी कोणाला विराजमान करायचे, यावर पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये खल सुरू असून दोन दिवसांत दोन बैठका झाल्या. भाजपाने महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी ८ अर्ज घेतले असून दोन्ही पदांचे अर्ज शुक्रवारी दाखल केले जाणार आहेत.

पक्षाचे प्रमुख नेते खा.अशोक चव्हाण यांचे बुधवारी सायंकाळी येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी रात्री उशीरा पक्षातील पुरूष नगरसेवकांची बैठक घेतली. चव्हाण व अन्य नेत्यांनी प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी चव्हाण यांच्यासह संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे आणि डी.पी.सावंत यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाली. हे स्थानिक नेते पुन्हा एकत्र बसणार असून पक्षाने सांगितल्यानुसार दोन्ही पदांसाठी नावांची शिफारस करणार आहेत.

वरील दोन्ही पदांसाठी कोणीही स्वतंत्रपणे अर्ज घेऊ नयेत, असे भाजपाकडून आपल्या नगरसेवकांना सांगण्यात आले आहे. नेत्यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या गटनेत्याने गुरुवारी प्रत्येकी ८ अर्ज घेतले. त्यानंतर शुक्रवारी कोणाकोणास अर्ज भरण्यास सांगितले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाकडून दोन्ही पदांसाठी चार चार-चार जणांचे अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दोन्ही पदांचे उमेदवार अंतिम करण्यास त्यानंतर पक्षाकडे बराच कालावधी आहे. त्यात कोण भाग्यवान ठरतो, याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.

महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून भाजपाकडे या प्रवर्गाच्या १२ महिला आहेत. त्यांच्यातूनच एका नगरसेविकेस संधी द्या; ओबीसी प्रवर्गातील महिला नको, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. पक्षाने दोन्ही पदांसाठी तीन नावे कळवा, असे स्थानिक नेत्यांना कळविले असले, तरी खा. अशोक चव्हाण यांचा कल पाहूनच दोन्ही पदांचा उमेदवार नक्की केला जाईल, असे दिसत आहे.

भाजपा नगरसेवकांतून बाहेर आलेल्या माहितीनुसार सुदर्शना महेश खोमणे, ज्योती कल्याणकर आणि वैशाली देशमुख या तिघींमध्ये चुरस निर्माण झाली असून माजी महापौर शैलजा किशोर स्वमी यांचेही नाव चर्चेत आहे; पण सर्वसाधारण प्रवर्गाला डावलून ओबीसींमध्ये असलेल्या शैलजा स्वामींचे नाव नक्की होईल का, असा प्रश्न येथे उपस्थित झाला; पण पूर्वी शैलजा स्वामी सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणातूनच महापौर झाल्या होत्या. ३४ पैकी ३२ जणांनी त्यांचे नाव सुचविले नव्हते, तरी चव्हाण यांनी त्यांना तेव्हा संधी दिली होती.

उपमहापौरपदासाठी काही नावांवर चर्चा झाली. दोन पदांचे उमेदवार नक्की करताना ‘एक मराठा आणि एक ओबीसी’ असे संतुलन राखण्याचा विचार केला जात आहे. काही अनुभवी नगरसेवकांना उपमहापौरपदापेक्षा स्थायी समिती सभापती होण्यात स्वारस्य असल्याचेही समोर आले. दीपकसिंह रावत यांनी उपमहापौरपद नको, असे स्पष्टपणे सांगितल्याचे समजते.