नांदेड : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही अपेक्षित पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट आतापासूनच गडद होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १३८.५ मिलिमीटर पाऊस कमी झाला असून, ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. १ ते २८ ऑगस्टदरम्यान यंदा अवघा ९५.३ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत तब्बल ३०६.४ मि.मी. पाऊस झाला होता.

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ५१५.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ५७.८८ टक्के आहे. २८ ऑगस्टपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाच्या तुलनेतही प्रत्यक्ष पर्जन्यमान केवळ ८३.८७ टक्के असल्याने पावसाची तूट स्पष्टपणे जाणवत आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची पाठ फिरली

गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या २६ तारखेपर्यंत ३०६.४ मि.मी. पाऊस झाला होता; मात्र यंदा २८ ऑगस्टपर्यंत केवळ ९५.३ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच यंदा ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. २०२४ मध्ये याच कालावधीत १२६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

विशेष म्हणजे, पावसाची ही तूट केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम भूगर्भातील पाणीसाठ्यावर होत आहे. अनेक ठिकाणी बोअरवेल आणि विहिरींचे पुनर्भरण झालेले नाही. काही भागांत पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून, अनेक बोअरवेल आटण्याच्या मार्गावर आहेत.

पावसाळ्यातच उन्हाळ्याची चाहूल!

ऑगस्ट महिना संपत आला तरी वातावरणात मात्र पावसाळ्याचे चित्र दिसत नाही. उन्हाळ्यासारखे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा नागरिकांना हैराण करीत आहे. पावसाची प्रतीक्षा करत असतानाच पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

अशीच परिस्थिती राहिली तर वर्षभर पाणी कसे पुरणार?

यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आता प्रत्यक्ष परिस्थितीत खरा ठरताना दिसत आहे. उर्वरित पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही, तर आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी पुरेसा पाऊस आणि जलसंधारणाची कामे आवश्यक असताना सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. आताच अनेक बोअरवेल रिचार्ज झालेल्या नाहीत; पाण्याचे स्रोत आटत असताना प्रशासन आणि नागरिकांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पावसाने अशीच दडी मारली तर पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि दैनंदिन वापराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे उरलेल्या पावसाळ्यात दमदार पावसाची आस लागली असून, अन्यथा ‘पाणी वाचवा’चा इशारा प्रत्यक्ष पाणीटंचाईत बदलण्याची भीती व्यक्त होत आहे.