नांदेड : शहराच्या मध्यवर्ती भागात महात्मा फुले यांचे नाव असलेल्या व्यापारी संकुलातील परिसरातील ‘वेलनेस स्पा’सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला देहव्यापार उघडकीस आणला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाने मंगळवारी रात्री संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत नेपाळसह नागालँड, दिल्ली, ठाणे आणि पुणे येथील ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर स्पा मालक फरार झाला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना फुले मार्केट रस्त्यावरील वेलनेस स्पा सेंटरमध्ये अवैध देहव्यापार चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी दोन शासकीय पंचांच्या समक्ष एक बोगस ग्राहक तयार करून स्पा सेंटरवर पाठवला. बोगस ग्राहकाचा मिस्ड कॉलद्वारे इशारा मिळताच पथकाने १ सप्टेंबरच्या रात्री स्पा सेंटरवर छापा टाकला. छाप्यादरम्यान स्पा मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांकडून चिन्हांकित केलेल्या नोटांसह १ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा (PITA) व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार स्पा मालक संतोष बघे याचा पोलीस शोध घेत आहेत, तर हिफजुर रहमान अरिफोद्दीन, रहाजुद्दिन रफिकुद्दिन व याहिया अहमद अब्दुल वाहीद (तिघेही रा.होजाई, आसाम) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
