नांदेड : ग्रामपंचायत स्तरावर शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता गावातील व ग्रामपंचायत कार्यालयातील स्वच्छतेसोबतच आठवड्यातून तीन दिवस शाळेतील साफसफाईचे काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी आदेश दि.२७ ऑक्टोबर रोजी दिले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ तसेच मुंबई ग्रामपंचायत नोकरांबाबतच्या (सेवेच्या शर्ती) नियम १९६० मधील तरतुदींचा आधार घेत हे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायतीची संख्या १ हजार ३२० एवढी आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील शिपाई गावातील केवळ कार्यालयातील साफसफाईचे काम करतात. मात्र शाळेतील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत शिपायांनी आठवड्यातून तीन दिवस शाळेतील साफसफाई करावी, असे आदेश ग्रामपंचायत स्तरावर निर्गमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत लेखी कळवून संबंधित कर्मचाऱ्यांकडून आदेशानुसार काम करून घ्यावे, असे गटविकास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर निर्गमित केलेल्या आदेशांच्या प्रती पंचायत समिती स्तरावर एकत्रित करून जिल्हा परिषद कार्यालयात सादर कराव्यात, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत उपलब्ध होणार असून, शाळांमधील स्वच्छता राखण्याच्या कामाला अधिक शिस्त लागण्याची अपेक्षा आहे.
शालेय पोषण आहार शिजवणारे करतात सफाई!
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पंतप्रधान पोषण शक्ती योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार शिजवला जातो. हा आहार शिजवणारे अनेक स्वयपांकी शाळेची साफसफाई करतात. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळे सफाई करुन शालेय पोषण आहार शिजवणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
