छत्रपती संभाजीनगर – एक नाही, दोन वेळा नाही तर तब्बल आठवेळा एका महिलेचे बाळंतपण हे बाण, बांबू आणि ब्लेडसारख्या अवजारी पद्धतीच्या सहाय्याने करण्यात येत असल्याच्या घटना असाध्यरोग आणि त्याच्या निदान-उपचाराची देदीप्यमान प्रगती साधलेल्या कालखंडात घडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अशा वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सुमोटो जनहित याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेत सक्षम प्राधिकाऱ्यांनी ३ आठवड्यात सुधारीत मुद्दांवर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेणेगावकर यांनी दिले. या सुमोटो जनहित याचिकेवर एप्रिल महिन्याच्या २१ तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील काही दुर्गम भागांत पुरुष दाईंमार्फत प्रसूती केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती वृत्तातून समोर आली होती. प्रसूतीदरम्यान गंभीर परिस्थिती उद्भवल्यास ब्लेडच्या साहाय्याने मृत बाळ बाहेर काढले जाते, तसेच प्रसूतिला तीव्र वेदना होत असल्यास मोहाची दारू पाजल्याच्या बाबीही निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागविली होती.

दरम्यान यापूर्वी झालेल्या सुनावणीत, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती सादर केली. नंदूरबार, अक्कलकुवा व धडगाव परिसरातील अनेक गावे डोंगराळ भागात असून लोक विखुरलेल्या पाड्यांवर राहतात. पावसाळ्यात या भागांत पोहोचणे कठीण असल्याने पूर्वी अनेक महिलांची प्रसूती घरीच होत असे, असे त्यांनी सांगितले होते.

सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षांपूर्वी नंदूरबार व किनवट परिसरात सुमारे १८ टक्के प्रसूती घरी होत होत्या. सध्या हे प्रमाण चार टक्क्यांवर आले असले तरी परिस्थिती चिंताजनक असल्याचे खंडपीठाने नमूद केले. तसेच नंदूरबार जिल्ह्यात आरोग्य सेविकांची सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याची बाबही न्यायालयाने गंभीर मानली.

विज्ञान युगात मानव आता सूर्यावर जायची आणि चंद्रावर वास्तव्य करण्याची तयारी करत असताना, विज्ञानाच्याच आधारे संशोधन करून आरोग्य क्षेत्रातही देदीप्यमान कामगिरी करत यकृत, हृदयही तयार करून असाध्य रुग्णांचे आयुष्यमान वाढवत असतानाच्या काळात आदिवासी पाड्यांवर अजूनही आरोग्य सेवा पूर्णपणे पोहोचलेली दिसत नसल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अजूनही आदिवासी लोक जुन्या, पारंपरिक आणि जीवावर बेतणारी घातक उपचार पद्धती अवलंबत असल्याचेच दिसून येत आहे.