परभणी : नसरापुर येथे एका चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येथे विविध पक्ष, संघटनांच्या वतीने सोमवारी(दि. ४) धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. नसरापूर घटनेतील अशा प्रकारच्या नराधमांना कायद्याचा धाक बसला पाहिजे, भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी अशा आरोपी नराधमांवर तातडीने कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच या घटनेच्या निषेधार्थ पुणे येथील नवले पुलावर नागरिक जमले असता त्यावर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार करण्यात आला, कायद्याचा धाक आणि बळाचा वापर गुन्हेगारांसाठी असायला हवा मात्र या प्रकरणात पोलिसांनी जनसामान्यांवर लाठीमार केल्याचा या आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

पोलिसी बाळाचा वापर करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमदारावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला लाजवेल अशी घटना घडल्याने तसेच चिमुकलीवर बलात्कार करून तिचा चेहरा ओळखायला येऊ नये म्हणून दगडाने ठेचून मृतदेह शेणात लपवल्याने या घटनेविरुद्ध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील आरोपी नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.          

परभणीकरांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदानावर घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात भारतीय जनता पक्ष, संभाजी ब्रिगेड, परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन, शिवसेना आदी पक्षांच्यावतीने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य परभणीकर नागरिक या धरणे आंदोलनात सहभागी झाले.