छत्रपती संभाजीनगर – “अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा”, “तिथे जन्मला तो गुणातीथ एका”, “नमस्कार माझा सदगुरु एकनाथा” असे अभंग गात पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्यास सोमवारी नगर प्रदक्षिणेने प्रारंभ झाला. अवघी नाथनगरी “भानुदास-एकनाथ”च्या जयघोषाने दुमदुमून गेली. दक्षिण काशीतील पैठण नगरीत ४२७ व्या नाथषष्ठीतील मुख्य तीन दिवसीय उत्सवास ९ सोमवारपासून सुरुवात झाली आहे. भल्या पहाटे या सोहळ्यात सहभागी झालेल्या जवळपास पाचशेच्या वर दाखल दिंड्यावर पैठणकरांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. षष्ठी निमित्त आलेल्या भाविकांनी नाथसागर व वाळवंटातील गोदावरीत स्नान करून दिंड्यांनी नगर प्रदक्षणेस सुरुवात केली.

नाथसागर परिसरातील पर्यटक चौकातील संतपीठातुन, नाराळा, दक्षिण काशी मैदान, नवीन कावसन ,यशवंत नगर,लक्ष्मी नगर, साळीवाडा, पावर हाऊस परिसर, नागघाट, रंगारहट्टी घाट,वाळवंट परिसर संतनगर व अदि ठिकाणाहून दिंड्या गावातील नाथ मंदिरातील विजयी पांडुरंग व नाथ समाधी दर्शनासाठी निघाल्या होत्या. दुपारी गावातील नाथ मंदिरातील नाथ वंशस्थासह मानाच्या दिंड्याही निघाल्या. बाहेर गावाहून आलेल्या दिंड्यांची प्रदक्षणा मध्यरात्रीपर्यंत चालते.

विविध दिंड्यांच्या फडावर नाथांनी फाल्गुन वद्य षष्ठीला रविवारी सन १५९९ साली पैठणच्या कृष्ण कमल तिर्थावर गोदावरीत दुपारी १२ वाजता जलसमाधी घेतली होती. त्यामुळे संत महंत व महाराजांनी नाथांचा जलसमाधी उत्सव यावर किर्तने केली. फडावरील किर्तने ऐकण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फाल्गुन मध्ये षष्ठीच्या मध्यरात्री नंतर गावातील नाथ मंदिरात पुरोहितांच्या मंत्रघोषात विजयी पांडुरंगाचा महाभिषेक संपन्न झाला. तर सकाळच्या सत्रात बाहेरील नाथ मंदिरातील नाथसमाधी पादुंकाचा महाभिषेक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक केला.

नगर प्रदक्षणेसाठी निघालेल्या दिंड्या भानुदास एकनाथांचा गजर करीत तल्लीन होऊन नाचत होते. सामाजिक संघटनांकडून यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना प्रसाद वाटण्यात येत होता. विविध प्रशासनाचे अधिकारी तथा कर्मचारी वारकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात मग्न होते. बसेस व अन्य वाहनांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे वारकऱ्यांची पैठणला ये-जा सुरू होती.त्यामुळे गर्दी पांगतांना दिसत होती. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था चोख ठेवल्याचे चित्र होते. नाथषष्ठी यात्रेत जवळपास एक हजार संत महंत व महाराज सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. नाथषष्ठी निमित्ताने दिंड्या फडांवर भजन, किर्तन, भारुडे,जागर असे कार्यक्रम पार पडतांना दिसत होते.

नाथषष्ठीतील उत्सव

९ मार्च रोजी नाथांचा जलसमाधी उत्सव. १० मार्चला नाथांचा छबिना उत्सव व संत महंतांचा सत्काराचा कार्यक्रम. ११ मार्चला नाथ काला अष्टमी सोहळा पार पडणार आहे.