मोठा गाजावाजा करून औरंगाबादसह मराठवाडय़ातील रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १७ हजार कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली खरी; पण हे रस्ते सरकारच्या उर्वरित काळात पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने आता हे रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करून ते चौपदरी ऐवजी दुपदरी करण्याच्या घाट घातला जात असल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले. असे करण्यासाठी रस्त्यांवर दररोज दहा हजारांपेक्षा कमी वाहतूक होत असल्याच्या कागदपत्रांची जमावाजमवदेखील सरकारी यंत्रणांनी पूर्ण केली आहे. जर एखाद्या रस्त्यावर दहा हजारापेक्षा अधिक वाहनांची वाहतूक असेल, तर तो रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केला जावा, असा निकष आहे.

राज्यात राष्ट्रीय महामार्गासाठी केले जाणारे भूसंपादन कमालीचे रेंगाळले असल्याने आता भूसंपादन अधिकाऱ्यास राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातच बसविण्याबाबतचा निर्णय नुकताच राज्य शासनाने काढला आहे. जे भूसंपादनाचे काम होण्यास वर्षभराचा कालावधी पुरेसा असतो, तेथे तीन वषार्ंहून अधिक काळ संपादनाच्या प्रक्रियेला लावले जात आहेत. कासवाच्या गतीने होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेमुळे रस्त्यांच्या कामाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे ५० किलोमीटरचे काम आता पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्याचे काम कमालीचे रेंगाळले.

परिणामी रस्त्यांची कामे मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने आता नवा मार्ग शोधला जात आहे. नव्याने ज्या रस्त्यांची घोषणा राष्ट्रीय महामार्ग म्हणून करण्यात आली होती. ते रस्ते चार पदरी होतील, असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र, रस्ते लवकर चकाचक करायचे असतील तर ते चौपदरी करताना भूसंपादन करावे लागेल. ज्यामध्ये कमालीचा वेळ जाईल. परिणामी केलेले काम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत दिसण्याची शक्यता कमी असल्याने आता चौपदरी रस्ते दोन पदरी करण्याचा घाट घातला जात आहे. केंद्राकडून राज्य सरकार पैसा घेईल आणि राज्य रस्ते विकास मंडळाकडून त्याचे पुढील काम पूर्ण केले जाणार आहे. परिणामी रस्ते रुंद होऊन वाहतुकीचा वेग वाढेल, या म्हणण्याला फाटा देण्यात आला आहे. नियोजित रस्त्यांचा मार्ग राष्ट्रीय करण्याच्या योग्यतेचाच नाही, अशी आकडेवारी परिवहन विभागाकडून घेण्यात आली आहे.

यातील काही रस्त्यांचे चौपदरीकरण हे आवश्यक होते. अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाताना औरंगाबाद-जळगाव रस्ता चौपदरीऐवजी आता दुपदरी केला जाणार आहे. तातडीने दोन पदरी रस्ते गुळगुळीत करायचे आणि सर्वसामान्यांच्या मनात सरकार चांगले काम करते आहे, अशी भावना निर्माण करायची, असा प्रकार सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. औरंगाबाद शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम मात्र राष्ट्रीय महामार्गाकडून पूर्ण केले जाणार असून शहरातून जाणारा जालना रोड दहा पदरी केला जाणार आहे. त्याबाबतच्या मंजुरीची सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहेत.