जालना – जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वितरित केलेल्या अनुदान घोटाळ्यात आणखी चार जणांना अटक झाल्याने या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या ३१ झाली आहे.

तक्रारी आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीने चौकशी करुन एकुण २४० गावामध्ये २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ इतक्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिला होता.त्यानंतर नंतर सदर प्रकरणात २२ तलाठी, तहसिल कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन विभागातर्गत कामकाज करणारे पाच कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालय येथे नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात काम करणारा एक अशा एकुण २८ आरोपींविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी पोलीसांना सापडत नव्हते. आरोपी मोबाईल वापरत नव्हते तसेच समाज माध्यमांपासून सुध्दा दूर राहत होते. त्यामुळे अटकेसाठी अडसर येत होता. तरी सुध्दा त्यांचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने एकुण ३१ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालय अंबड येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केले होते. ते अर्ज फेटाळुन लावल्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी धाव घेतली होती.परंतु तेथेही त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले.

या गुन्हयात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे तलाठी कैलास शिवाजीराव घारे (केंधळी ता. मंठा), रमेश लक्ष्मण कांबळे (इंदेवाडी अंबड रोड), तलाठ्यांना सहकार्य करणारे खाजगी व्यक्ती राजेंद्र रघुनाथ मोताळे (बेलगाव, जिल्हा जालना) आणि ज्ञानेश्वर नारायण गारोळे (दहयाळा जिल्हा जालना), अशी आहेत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.