छत्रपती संभाजीनगर – परळी वैजनाथ नगरपालिकेत अवघे दोन सदस्य असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एमआयएमला सोबत घेतल्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरुद्ध तीव्र संताप आणि नाराज व्यक्त केल्यानंतर एमआयएमच्या नगरसेविकेने स्थापन केलेल्या संयुक्त गटातून माघार घेत असल्याचे पत्र काढले. एमआयएमला हे पत्र द्यायला लावण्यामागे चौफेर टीका ओढवून घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसच असून एका अर्थाने त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचा संदेश गेला आहे.

परळी नगरपरिषद गटनेता निवडीमध्ये शहरातून निवडून आलेल्या एकमेव एआयएमआयएमच्या नगरसेविका शेख आयेशा मोहसीन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना गटाला पाठिंबा दर्शवला होता.

जिल्हाधिकाऱ्यांसमोरच राष्ट्रवादीचे १७ (नगराध्यक्षांसह) सदस्य, शिवसेनेचे २, एमआयएम १ व चार अपक्ष, असा २४ सदस्यांचा गट स्थापन करण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले होते. एमआयएमला सोबत घेतल्याची “शाळा” ओळखून भाजपने शिताफिने महायुतीत निवडणूक लढवूनही स्वतंत्रपणे नऊ सदस्यांचा गट स्थापन केला होता. एमआयएमला सोबत घेतल्याने राष्ट्रवादीची राज्यभर नाचक्की आणि वादंग उठले होते.

अखेर शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांकडून स्थानिक प्रमुख नेत्यांना बाहेर पडण्याच्या सूचना आल्यानंतर तातडीने जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी भूमिका स्पष्ट करत एमआयएमला सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय शिवसेनेला अंधारात ठेवून घेतल्याचा आरोप केला. एमआयएमला बाहेर काढा अन्यथा आम्ही बाहेर पडू, अशी भूमिका माध्यमांसमोर ठेवल्याने राष्ट्रवादी नरमली असून, त्यांनी एक पाऊल मागे घेत एमआयएमला पाठिंब्याचे पत्र मागे घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. शनिवार व रविवारी सुटी असल्याने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नसल्याने सोमवारी अखेर एमआयएमने अधिकृतरीत्या राष्ट्रवादी-शिवसेना गटात सहभागी होत असल्याच्या संदर्भातील पत्र मागे घेतले.

आम्ही स्वतःहून एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता, विकासाच्या मुद्यावर आम्ही विरोधी पक्षांना साद घातली होती, त्यात एमआयएमकडून प्रतिसाद मिळाला. त्याचे आम्ही स्वागत केले होते, अशी भूमिका राष्ट्रवादीचे गटनेते वैजनाथ साळुंके यांनी यापूर्वी मांडली होती.