ncp to support shiv sena in lok sabha elections in marathwada zws 70 | Loksatta

मराठवाडय़ात लोकसभा निवडणूक तयारीत : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल मागेच!

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण मात्र चाचपणी करत आहेत.

मराठवाडय़ात लोकसभा निवडणूक तयारीत : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल मागेच!
(संग्रहित छायाचित्र) file photo

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता 

औरंगाबाद : मराठवाडय़ात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष भाजपविरोधात आक्रमक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘आपला विधानसभा मतदारसंघच भला’, या मानसिकतेत आहे. राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेला सहकार्य करण्याची राहील, असा अंदाज असल्याने बीड लोकसभा वगळता अन्य मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल मागेच असे चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे.

औरंगाबाद व जालना हे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाचे. पण सतत अपयश पदरी बाळगणारे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना अनामत रक्कमही वाचवता आली नव्हती. जालना मतदारसंघातही काँग्रेसची अवस्था अक्षरश: कुपोषित. औरंगाबादहून पाठविलेले विलास औताडे हे उमेदवार निवडणूक काळातही पुरेसा प्रचार करू शकले नाहीत. पण या  मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधी दावा सांगितला गेला नाही. खरे तर जालना लोकसभा मतदारसंघ लढवू शकण्याची ताकद आमदार राजेश टोपे यांच्यामध्ये असली तरी त्यांची बांधणी मात्र अजूनही विधानसभा मतदारसंघापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण मात्र चाचपणी करत आहेत. पण धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणावर या मतदारसंघातील उमेदवारीचे निर्णय घ्यावे लागत असल्याने त्याचे बांधणीचे कामही आस्ते कदमच आहे.

बीड, उस्मानाबाद व परभणी या काँग्रेस व राष्ट्रवादीतील आघाडीतील हक्काच्या मतदारसंघात बीडमधून अमरसिंह पंडित वगळता अन्य मतदारसंघात कोणी उमेदवारीसाठी फारसा पुढाकार घेणार नाही, असेच चित्र आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असल्याने या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान असणार आहे. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, धनंजय मुंडे व बाळासाहेब आसबे या आमदारांच्या जोरावर राष्ट्रवादीची बांधणी चांगली असल्याने बीडमध्ये राष्ट्रवादीच्या राजकीय हालचाली दिसून येतात. उस्मानाबाद मतदारसंघात लोकसभा मतदारसंघ बांधून ठेवू शकेल असा उमेदवार अद्यापि राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिसून येत नाही.

 राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह लावले जाते. येथे कोणी उमेदवारी मिळावी म्हणून बांधणी करतानाही दिसून येत नाही. परभणी जिल्हा हा १९८९ पासून शिवसेनेला साथ देणारा लोकसभा मतदारसंघ. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी चांगली लढत दिली होती. महाविकास आघाडीच्या रचनेत आता शिवसेनेविरोधात निवडणूक लढविणे शक्य नसल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने विटेकर विधानसभा मतदारसंघाच्या शोधात आहेत. त्यामुळे हा मतदारसंघही राष्ट्रवादीच्या हाती येणार नाही. हिंगोली मतदारसंघात राजीव सातव यांच्यामुळे काँग्रेसचे प्राबल्य होतेच. लातूर, नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद असल्याने या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला फारसा जोर लावता येणार नाही. परिणामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत मराठवाडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल मागेच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 01:07 IST
Next Story
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रखडण्यामागे बिघडलेले आर्थिक गणित!; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे मत