छत्रपती संभाजीनगर : पवार घरातील व्यक्ती जोपर्यंत प्रमूख पदावर असेल तोपर्यंतच राष्ट्रवादी एकसंघ राहील. त्यामुळे या प्रकरणी प्रसंगी शरद पवार यांनी हस्तक्षेप करावा अशी आमची विनंती असेल असे मत आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. एकसंघ राष्ट्रवादीसाठी पवार कुटुंबिया पलीकडे कोणी असू नये अशी आम्हा सर्वांची भावना आहे.
अजित पवार यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत. नेत्याच्या निधनाने मंत्रालयाच्या पातळीवर मार्गी लागणारे प्रश्न या पुढे अडकून पडतील, अशी भावना सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशा नाजूक आणि अवघड स्थितीतून पुढे जाण्यासाठी पवार कुटुंबियातील व्यक्तीच प्रमूख पदी असायला हवी, अशी सर्वांची भावना आहे. विशेषत: सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भूमिका व्यक्त केली जात होती.
पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणारे आमदार सतीश चव्हाण हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जात. मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या अनुषंगाने होणाऱ्या निर्णयांमध्ये त्यांचे मत विचारात घेतले जात. राष्ट्रवादी वाढत असताना अजित पवार यांचे निधन कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे शरद पवार यांनी प्रसंगी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात आहे. जर पक्ष एकसंघ ठेवायचा असेल तर पवार कुटुंबियातील व्यक्तीच प्रमूख पदी असावी अशी मागणी केली जात आहे.

