छत्रपती संभाजीनगर – वैद्यकीय प्रवेश पूर्व (नीट) परीक्षेविषयी नकारात्मक भावनाच अधिक वाढल्याचे चित्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये तीव्र ताण, पुन्हा श्रेयांक मिळेल की नाही, याविषयीची चिंता, निरुत्साह, नैराश्य, व्यवस्थेविषयीचा राग, अविश्वास, नको बाबा ती नीट परीक्षा, अशा भावभावना असून, यामध्ये अनेक डाॅक्टरांचे पाल्यही असल्याचे निरीक्षण विविध समुपदेशकांकडून नोंदवण्यात येत आहे.

आठवडाभरापूर्वी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रश्न समोर आल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची मानसिकता एकदम कोलमडली असून, आता पुन्हा जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्याएवढे मानसिक बळ त्यांच्याकडे उरले नाही. ही समस्या केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील विद्यार्थ्यांची झालेली असून, सकारात्मक मानसिक विचार करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचीही पावले ठिकठिकाणच्या मानसतज्ज्ञांकडे, समुपदेशकांकडे वळत आहेत. मानसतज्ज्ञांनी मागील तीन वर्षातील आकडेवारीनुसार नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सायकाॅलाॅजिस्ट वेल्फेअर ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा मानसतज्ज्ञ डाॅ. संदीप शिसोदे यांनी सध्या नीट प्रकरणानंतर वैद्यकीय शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थी, पालकांकडून समुपदेशनासाठी संपर्क होत आहे. आठवडाभरात तीस विद्यार्थी आपल्याकडे येऊन समुपदेशन करून गेले आहेत. नैराश्य, निरुत्साह, पुन्हा तयारी करून निकाल अपेक्षित हाती येईल की नाही, मेहनत वाया गेली तर ? याविषयी साशंकतेने भरलेले त्यांचे सध्याचे मन असल्याचे दिसत असून, निद्रानाश, डोकेदुखी, थकवा, भूक कमी होणे, अनेकांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात २०२४ साली २ लाख ७५ हजार लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २०२५ मध्ये २ लाख ६० ते ७० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर २०२६ मध्ये २ लाख ७० हजारांच्या आसपासची नोंदणी असावी. यामध्ये नीट देणाऱ्यांच्या संख्येत घट दर्शवते आहे, असे निरीक्षण डाॅ. शिसोदे यांनी नोंदवले आहे.

सायकाॅलाॅजिस्ट वेल्फेअर ऑफ असोसिएशनच्या (पीडब्ल्यूए) डाॅक्टरांकडे राज्यातून दररोज नीटचे विद्यार्थी, पालक समुपदेशनाकडे येत असल्याचे चित्र आहे. आठवडाभरात १८ ते २० हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन झाले असण्याचा अंदाज आहे. आपल्याकडे ३० विद्यार्थी येऊन गेले. पालकांनी आता किती अभ्यास झाला, असे विचारणे कमी करावे. तुलना टाळावी. परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही, हा दृष्टिकोन द्यावा. – डाॅ. संदीप शिसोदे, अध्यक्ष, पीडब्ल्यूए तथा मानसतज्ज्ञ.

आपल्याकडे तीन डाॅक्टरांच्याच मुलींनी आता पुन्हा नीट नको द्यायला, असे मत मांडले आहे. आपल्या नात्यातील एक मुलगीही नीट नको म्हणतेय. व्यवस्थेवरचा विश्वास उडाला, पुन्हा श्रेयांक मिळेल की नाही, याबाबतची साशंकता, अशा भावना आहेत. २०१५ ते २०२६ या कालावधीत तीनवेळा नीटचा घोळ समोर आला आहे. वर्ष वाया न जाता एक संधी मिळाली आहे, असे समजावून सांगण्यात येत आहे. – डाॅ. ज्योती तानवडे, समुपदेशक